राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची नोटीस; नव्याने निवडणूक घेण्याची मागणी
मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या घडामोडीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काय आहे नोटिशीतील आक्षेप?
सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत २६ फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. (राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नवा वाद )तसेच, नवीन निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य घोषित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सिंह यांच्या दाव्यानुसार, पक्षाचे सुधारित संविधान निवडणूक आयोगाकडे सादर झाल्यानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईपर्यंत सर्व अधिकार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडे असणे अपेक्षित होते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी २६ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आवाहन कोणत्या अधिकारात केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बैठकीसंदर्भातील पत्र पाठवताना तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती, असाही दावा नोटिशीत करण्यात आला आहे.
पक्षात चर्चांना उधाण
सच्चिदानंद सिंह हे तुलनेने कमी परिचित नेते असल्याने त्यांनी थेट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वालाच आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नवा वाद )या संपूर्ण प्रकरणामागे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे का, याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांना संबंधित नेत्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले आहे.
तटकरे आणि पटेल यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. “सच्चिदानंद सिंह कोण आहेत, हेही मला माहिती नाही. त्यांच्या नोटिशीशी माझा काहीही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
प्रफुल पटेल यांनीही नोटिशीला विशेष महत्त्व देण्याचे कारण नसल्याचे सांगितले. “सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या संविधानानुसारच झाली आहे. पक्षात काही सुधारणा आवश्यक असल्याचे माझे वैयक्तिक मत असले, तरी त्याचा या नोटिशीशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वाद आणखी चिघळण्याची शक्यता
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली होती. मात्र, ही संपूर्ण निवड प्रक्रिया पक्षाच्या संविधानाविरोधात आणि बेकायदेशीर असल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी नोटिशीत केला आहे. त्यामुळे या वादावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते आणि पुढील घडामोडी कोणत्या दिशेने जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नवा वाद )





