मुंबई:
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव याही अडचणीत आल्यानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आयकर विभागाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे,इतकेच नव्हे तर जाधव यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता. आयकर विभागाने जाधव यांच्यावर फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राच्या चौकशीत ही बाब समोर आली. तसेच कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाचा समावेश असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. तसेच यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची दिवसेंदिवस नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत.