Why is Twitter controversial in India?

ट्विटर  भारतात का वादग्रस्त ठरली ?

 स्पेशल रिपोर्ट 
गत काही महिन्यांपासून देशात  ट्विटर हे विविध वादामुळे चर्चेत आले आहे. मात्र ट्विटरची भूमिका ही संशयाच्या फेरीतच  अडकली आहे. प्रारंभी आयटी नियमांच्या पालनावरून ट्विटर आणि केंद्रसरकारमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर टूल किटचा आरोप, मोदीसरकारमधील अनेकांना ट्विटरने दिलेला धक्का, दिल्ली पोलिसांच्या नोटीस आणि कारवाईला ट्विटरकडून आक्षेप,नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात  सुरु झालेला संघर्ष,व्यासपीठाचा दुरुपयोग आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण या मुद्द्यावरून ट्विटरला बजावण्यात आलेले समन्स यासह अनेक मुद्द्यांनी ट्विटर वादग्रस्त ठरली. त्यात भारताचा नकाशा तीनहून अधिक वेळा चुकीचा दाखवण्याचा ‘प्रताप’ ही ट्विटरने केला. त्यात आता  ट्विटरविरोधात काँग्रेसने दंड थोपटले. त्यामागे  काँग्रेसचे माजी  अध्यक्ष राहुल गांधींसह हजारो नेत्यांचे  अकाऊंट   ट्विटरने ब्लॉक केल्याचे कारण होते;पण देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचे तसेच हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याची टीका  राहुल गांधी यांच्याकडून आक्रमकतेने झाल्यानंतर   लगेच  ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आणि आता  ट्विटर  इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष माहेश्वरी यांनी राजीनामा दिला आहे. मग ट्विटर इंडिया का वादग्रस्त ठरली. त्यामागे कोणती कारणे होती. ट्विटरचा उद्देश काय ? धोरण नक्की कोणते यासह अनेक मुद्दे गंभीर बनले आहेत.
ट्विटर  इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष माहेश्वरी यांच्या काळात हे वाद निर्माण झाले. ते का आणि कुणी केले ? हा मुद्दा राजकीय वर्तुळात जरी एकमेकांविरोधात  आरोप- प्रत्यारोपांसाठी असला तरी ट्विटरने खरेच  राजकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला का ?हा प्रश्न महत्वाचा आहे. जर तसे असेल तर राहुल गांधी यांच्या  ट्विटरकडून देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ले होत आहे,या दाव्याला दुर्लक्षून करून चालणार नाही.
 भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी 18 मे रोजी एक ट्विट केले होते. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला.  एका टूलकिटद्वारे हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. टूल किटच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस वातावरण पेटवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पात्रांच्या ट्विटर  अकाऊंटवरच कारवाई
काँग्रेसने  तयार केलेली कागदपत्रे बनावट आहेत.  ही कागदपत्रे भाजपच्या नेत्यांनी तयार केले आहेत.  चुकीच्या पद्धतीने राजकीय लाभ मिळवण्यासाठी ही माहिती  पसरवली जात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.  त्यानंतर ट्विटरने भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट हे manipulated असल्याचे फ्लॅग केले.
त्यानंतर ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद उफाळला. दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला नोटीस पाठवली. कारवाईसाठी ट्विटर इंडियाच्या कार्यालयात गेले. मात्र पोलिसांकडून धमकीसाठी वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक असल्याचे ट्विटरने म्हटले होते.
संघर्ष पेटला… 
त्यात  नवीन  सोशल मीडिया कायद्यामुळे ट्विटरच्या अडचणीत भर पडली. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरू झाला. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने ट्विटरला व्यासपीठाचा दुरुपयोग आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण या मुद्द्यावरून समन्स बजावले.राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने पोस्को कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ट्विटर विरोधात पोलिसांनी नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले असतानाच त्यात आणखीन  भर पडली. ते केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाउंट  एक तास लॉगिन झाले नाही. त्यावरून रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर टीकेची तोफ डागली.नवीन कायद्यामुळे ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद झाला. त्याचा फटका आयटी राज्यमंत्री राजू चंद्रशेखर यांनाच बसला.   राज्यमंत्री होताच, त्यांच्या  अकाऊंटचे ब्लू टिक काहीवेळ करता ट्विटरने  काढले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही ट्विटरने सोडले नाही. इतकेच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हँडलवरील  ब्लू टिकही  काढून टाकण्यात आले.
भारताचा नकाशा अनेक  वेळा चुकीचा दाखवला…
वादग्रस्त ठरलेल्या ट्विटरने भारताचा नकाशा तीनहून अधिक वेळा चुकीचा दाखवला. भारतातील लडाख  हा चीनचा भाग असल्याचे दाखवले होते.  त्यानंतर पुन्हा नकाशामध्ये भारतापासून जम्मू  आणि लडाख  हे स्वतंत्र देश दाखवले.
 हे सगळं ‘ठरवून ‘?
दिल्लीत बलात्कार करून हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या  पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत ट्विटर  अकाऊंटही बंद केले.  माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या पाच हजाराहून अधिक नेत्यांचे  अकाऊंट  ट्विटरने ब्लॉक केले . ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचे ट्विटरने  म्हटले. त्यानंतर काँग्रेसने  आक्रमक पवित्रा घेतला.  राजकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप आणि देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ले  होत असल्याची टीका त्यांनी केली. तर ट्विटरने नरमाईचे धोरण स्वीकारत कारवाई मागे घेतली.
आता ट्विटर  इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष माहेश्वरी यांनी राजीनामा दिला आहे.  ते वरिष्ठ पदे पदाची जबाबदारी अमेरिकेत स्वीकारणार आहेत.  माहेश्वरी ट्विटरमध्येच आहेत आणि नवीन जबाबदारी स्वीकारणार असल्याचे म्हटले जात आहे.असे  असले तरी ट्विटर इंडियामध्ये  ते वादग्रस्त का ठरले कि, हे सगळं ‘ठरवून ‘या सदरात होते का?हाच मुद्दा सध्या महत्वाचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *