मुंबई।
दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली आहे. विरोधकांकडून सडकून टीका होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त व नियम सांगितले आहे. त्याचे पालन करावेच लागेल,असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवाय जनतेचे प्राण धोक्यात आणणाऱ्या यात्रा, कार्यक्रम कशाला? अशा शब्दात भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरही त्यांनी टीका केली.
आज जे आंदोलन करत आहेत,त्यांच्यात प्रगल्भता नाही उलट आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन अडचणीत आणत आहेत. केंद्र सरकारने सणांच्या दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली आहे आणि राज्यसरकारला काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.केंद्राने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार सणांदरम्यान काळजी घेण्याचे राज्यसरकारला सांगितले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव काळात गर्दी टाळा असे केंद्राने कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छित आहेत त्यांना मला केंद्राकडून आलेले पत्र दाखवायचे आहे. आरोग्यविषयक सुविधा निर्माण न करता काहीजणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेतन हे खूप दुर्दैवी असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. काहीजण तारीख पे तारीखचा कारभार करतात, प्रत्यक्षात काहीच करत नाही. मात्र पंधरा दिवसापूर्वी तारीख घेऊन जनतेचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प सुरु केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्र्यांनी शाबासकीही दिली. हे काही स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे.हेही त्यांनी नमूद केले.