मुंबई|उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा निषेध करताना पटोले यांनी हा आरोप केला आहे. पटोले म्हणाले, मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. या मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार आटापिटा करतात. याचा अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून तालिबानी राज असल्याचे स्पष्ट होत आहे. पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दीपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले. त्यांना बेकायदेशीर अटकही केली. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी ,दलित ,वंचित, अल्पसंख्याक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत. पीडित कुटुंबीयांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांना भाजप व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का ? असा सवालही पटोले यांनी केला आहे.