bjp gujrat Congress narendra modi Patidar community Gujarat Bharatiya Janata Party forthcoming Assembly elections

… बोलणार कोण ?

भाजपमध्ये घराणेशाही अजिबात नाही,हे सत्य आहे.पण एक -दोन नेत्यांनीच अख्खी  सत्ता ‘ काबीज’ केली  आहे, हे वास्तव आहे. ज्या  काँग्रेसवर सातत्याने  ‘हुकूमशाही’ची टीका करणाऱ्या  भाजपमध्येच  काँग्रेसमधील   ‘हायकमांड’ची संस्कृती रुजताना दिसत आहे;पण त्यावर भाजपमधून बोलणार कोण ? हा खरा प्रश्न आहे.   गुजरात मुख्यमंत्री पदावरून जैन या अल्पसंख्य समुदायातील विजय रूपानी यांना नारळ देण्यात आला आणि आर्थिकबाबतीत बलाढ्य व निर्णायकी मतसंख्या असलेल्या पाटीदार समाजासाठी पायघड्या घालण्यात आल्या. प्रथमच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. मात्र  दिल्लीतील एक -दोन पक्षश्रेष्ठींच्या अंगुलीनिर्देशावरून ही प्रक्रिया पार पडली  आहे.त्यात   गुजरात भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षाचे सदस्य केवळ नामधारीच आहेत,त्यांच्या मतांना कितपत स्थान आहे?हेच यानिमित्ताने स्पष्ट तर  झाले आहे शिवाय आमच्या पक्षात जातीपातींना महत्व नाही आणि तसा विचार आम्ही करत  नाही.  या भाजपच्या भूमिकेतही तथ्य नाही,हेही अधोरेखित झाले आहे. मुद्दा असा, हायकमांड ही संकल्पना काँग्रेसने रुजवली,त्यामुळेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीकडे टक लावून बघावे लागते अशी टीका करणाऱ्या भाजपमध्येच ‘हायकमांड’ ची संस्कृती खुलेआम रुजत आहे.
तसे पाहिले  तर गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले. मात्र पंतप्रधान म्हणून ते दिल्लीत गेले परंतु भाजपकडे बहुमत असतानाही तीन -तीन मुख्यमंत्री का आले ? हा प्रश्नही दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्की काय रणनीती यामागे आहे, हा भागही महत्वाचा आहे. गत काही महिन्यांचा आढावा घेतला तर, भाजपने हा बदललेला पाचवा मुख्यमंत्री आहे. आसाम, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरात येथे हे बदल करण्यात आले आहेत. मात्र त्यातून एकच बाब प्रकर्षाने जाणवते कि, अनपेक्षित निर्णयातून आपलेच वर्चस्व अबाधित आहे आणि ते निर्विवाद आहे,हेच पुन्हा एकदा बिंबवायचे. असे असले तरी ‘एका दगडात’च्या धर्तीवर हे प्रयोग करताना मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही, याचीही दक्षता बाळगली जात आहे. हेच गुजरातमध्ये पाटीदार समाजाला प्राधान्य दिल्याने अधोरेखित होत आहे. वास्तविक गुजरातमध्ये पाटीदार समाज अथवा समुदाय नाराज झाला तर त्यांची मते कुठे वळतील ? त्याचा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त फटका  बसू शकतो .  याचा सारासार विचार करूनच हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी एकहाती नेतृत्व कायम आहे ,हे  अप्रत्यक्षपणे दाखविण्यासाठी  शक्तीचे दर्शन घडविले गेले आहे ;पण ते करताना काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीचेच अनुकरण भाजप करत आहे.हाच संदेश यानिमित्ताने मिळाला आहे. कारण भूपेंद्र पटेल यांच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता, यापेक्षा त्यांचे नाव दिल्लीतूनच आले हा भाग महत्वाचा आहे.त्यामुळे जातपात विरहित, घराणेशाही नसलेला पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपमध्ये ‘मर्जी ‘ कुणाची चालते? हाच खरा मुद्दा आहे. तूर्तास ‘हायकमांड’  संस्कृतीचा विळखा भाजपभोवती घट्ट होत आहे;पण त्याविरोधात बोलणार कोण ?

– प्रविण पगारे    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *