news pune congres politics

पुण्यात काँग्रेसला सावरणार तरी कोण?

पुणे |आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पक्षाचे पालिकेत संख्याबळ कसे वाढेल यानुसार रणनीती आखून प्रत्यक्ष कामकाजही सुरु झालेले असताना निवडणुकीच्या निमित्ताने  काँग्रेस पक्षात पुन्हा गटबाजीचे खुलेआम दर्शन घडणार असल्याचे संकेत आतापासून मिळत आहे. त्यातही नेतृत्व कुणी करायचे यावरून शहर काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांमध्येच ‘ कलगीतुरा’ रंगणार असल्याचेच स्पष्ट झाले आहे. मात्र गटातटात विखुरलेल्या काँग्रेसला सावरणार तरी  कोण? हाच प्रश्न काँग्रेसच्या वर्तुळात निष्ठावंताकडून नेहमीप्रमाणे  उपस्थित केला जात आहे. 
पुणे महापालिका निवडणुकीसाठी  तीन सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित झाली  असली  तरी, ऐनवेळी दोन सदस्यीय प्रभाग होईल अशी चर्चा आहे. मात्र तीन सदस्यीय प्रभागासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर झालेला आहे;पण त्यात अनेक बदल आयोगाने सुचवले आहेत. अजूनही हा आराखडा अंतिम झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तो हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.तर दुसरीकडे निवडणुका लांबणीवर पडणार असे संकेतही मिळत आहेत. असे असले तरी  भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना इतकेच काय आप या पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार  मोर्चेबांधणी केली आहे. त्यानुसार शहरात आतापासूनच विविध कार्यक्रमातून पक्ष बांधणी, कार्यकर्त्यांची मोट बांधण्याबरोबरच   मतदारांना साद घातली जात आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप यात अग्रेसर असून विविध कार्यक्रमातून  नेत्यांच्या सभाही होत आहेत आणि एकमेकांवर टीकेची तोफ डागून प्रचाराचा धुराळा अप्रत्यक्ष उठवून तशी वातावरण निर्मितीही होत आहे.   नेमके याविरुद्ध स्थिती काँग्रेसची आहे.  
 
काँग्रेसकडूनही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यस्तरीय नेत्यांना पुण्यात आणले जात असले तरी, पुणेकरांच्या स्थानिक प्रश्नांना हात घातला जात नसल्याने ते कार्यक्रम केवळ नावापुरते ठरत असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे राज्याचे प्रश्न, देशावर भाष्य करून पुण्यात काँग्रेसची संख्या कशी वाढणार याकडेही काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत.तत्कालीन खासदार सुरेशभाई कलमाडी यांच्या काळात काँग्रेस एकसंध होती आणि पालिकेतच काय शहरात  पक्षाचे वर्चस्वही होते. मात्र सुरेशभाई कलमाडी यांच्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाली. काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले.सामूहिक नेतृत्वाचे प्रयोग फसले नाही, तर ते स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठीच फसवले. सुरेशभाई कलमाडी यांच्या काळात ज्यांनी ज्यांनी पक्षात, पालिकेत विविध पदे भूषवली,ते कलमाडी यांच्यानंतर स्वतःलाच नेते समजू लागले.काहींनी राजकीय महत्वाकांक्षासाठी काँग्रेसला ‘हात’ दाखवला आणि जिकडे सत्ता तिकडे वाटचाल केली.  त्यामुळे आज काँग्रेसवर अस्तित्वाची लढाई अशी वेळ ओढवली असल्याचे कार्यकत्यांचे म्हणणे आहे.पूर्वी काँग्रेसमध्येही संघर्ष व्हायचा मात्र माजी खासदार कलमाडी हे ती परिस्थिती हाताळण्यात   अव्वल ठरायचे. त्यामुळे त्याकाळात कलमाडी समर्थक विरुद्ध काँग्रेस निष्ठावंत असेही चित्र असायचे. मात्र काँग्रेसमधून कलमाडी हे ‘ हद्दपार’ झाल्यानंतर काँग्रेस जी नेतृत्वहीन झाली,ती आजतागायत कायम आहे.
 काँग्रेसकडून देशात, राज्यात जो आंदोलनाचा अजेंडा राबविला जातो, त्यानुसार पुण्यात आंदोलने होत आहेत.त्यामुळे पुणेकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पुणेकरांसाठी पालिकेतील काँग्रेसचे  पदाधिकारी आवाज उठवतात ;पण त्याला शहर काँग्रेसमधून साथ मिळत नाही तर शहर काँग्रेसच्या कार्यक्रमाला पालिकेतील कारभाऱ्यांनी दाद द्यायची नाही. असा कारभार सध्या काँग्रेसमध्ये आहे.  महाविकास आघाडीचे आंदोलने असतील, तर त्यात सहभाग नोंदवायचा ;पण पुणेकरांसाठी पर्यायाने सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात काँग्रेस पूर्ण ताकदीने रस्त्यावर दिसत नाही. हजारी प्रमुख संकल्पना राबवून एकेकाळी शहरावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसला पालिका काय शहर पातळीवरील स्थानिक नेतेवजा पदाधिकाऱ्यांमधील अहंकाराचा फटका बसत आहे. निवडणुका आल्या कि, तिकीट वाटपात स्वतःचे आणि सग्यासोयऱ्यांचे हित जोपासण्यासाठी एकत्र यायचे नंतर कुरघोड्यांचे राजकारण करत एकमेकांकडे पाठ फिरवयाची असा कारभार स्थानिक नेत्यांमध्ये सुरु आहे. मग काँग्रेसला गतवैभव कसे मिळणार हाच सवाल कार्यकर्त्यांचा  असून जर यंदाची निवडणूक स्वबळावर लढायचे ठरल्यास पक्षाची  तयारी काय, कोणते कृती कार्यक्रम, सर्वच प्रभागात उमेदवार द्यायचे असल्यास प्रभावी चेहरे कोण यावर काँग्रेसचे नेते या अविर्भावात वागणारे बोलतील का या मुद्द्याकडेही काँग्रेस निष्ठावंत लक्ष वेधत आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *