पुणे|
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये पालिकेच्या कारभारावरून टीकाटिपण्णी होऊ लागली आहे. शहरातील विकासकामांची सद्यस्थिती पाहता, मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जायचे या संभ्रमात सापडलेल्या कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांकडून आता पालिकेच्या कारभारावर थेट बोट ठेवले जात असून अंकुश कुणाचा हा सवालही केला जात आहे.
सध्या शहरात विकासाची कामे अजूनही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाच वर्षात प्रभागांमध्ये कोणती ठोस कामे केली,हे मतदारांना सांगावे लागणार आहे. मात्र शहरातील मेट्रो ,समान पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक सेवा या कामांवर प्रभागांमध्ये मते कशी मिळणार असा प्रश्न आता भाजपच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यातून पालिकेच्या कारभारावर पूर्वीसारखा अंकुश नसल्याचा मुद्दाही चर्चेत आणला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये वरकरणी गटबाजी संपुष्टात आल्याचे बोलले जात असले तरी, तशी वस्तुस्थिती नाही. उलट आता पालिका निवडणुकांमुळे पुन्हा गटबाजीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामागे आप -आपल्या गटाच्या समर्थकांना उमेदवारी मिळावी हा उद्देश असला तरी अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र सुरु झाली आहे. त्यामुळेच पालिकेच्या कारभारावर वचक नसल्याचा मुद्दा आता उकरून काढला जात आहे. मध्यंतरी पालिकेच्या कारभाऱ्यांची ‘ शाळा’ घेण्यात आली. मात्र त्याकडे पालिकेतील अनेकांनी पाठ फिरवली. त्यानंतर आता हा मुद्दा तापवला जात आहे. वास्तविक सध्या पालिकेच्या कारभारात समन्वय नसल्याची वस्तुस्थिती आहे. तीन ‘कारभारी’ ,बाकी नामधारी असा कारभार सत्ताधारी भाजपचा पालिकेत आहे. त्यात या कारभारावर कुणाचाच वचक नाही हे वास्तव आहे. पूर्वी पुण्याचा विकास या मुद्द्यावर पालिकेच्या कारभारावर खासदार, आमदार यांचा ठसा असायचा. मात्र आता तसे चित्र नाही.किंबहुना ते नको यासाठीच स्थानिक पदाधिकाऱ्यांची ठरवून खेळी झाली आहे. त्यामागे राजकीय महत्वाकांक्षा असल्यानेच आणि त्याला प्रदेश स्तरावरून खतपाणी मिळाल्याने पुण्याचा विकास भरकटत आहे,असा आरोपही होत आहे आणि नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार या ब्रॅंडिंगलाही आक्षेप घेतला जात आहे.त्यामुळे आता पालिकेत पाच वर्षे पूर्ण होत असली तरी येत्या पालिका निवडणुकीची सूत्रे कुणा एकाकडे तरी हवे ;पण पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडे नको,असा सूर आळवला जात आहे. सध्या पालिकेतील पदाधिकारीच निवडणुकीची सूत्रे हाताळत आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावरून आता कोणती भूमिका घेतली जाते याकडे भाजपच्या वर्तुळात गटातटाचे लक्ष लागले आहे.