पुणे ।२०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (2019 assembly elections) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते, असा दावा माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे.शिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनात बंडाचे बीज मीच पेरले असा गौप्यस्फोटही शिवतारे यांनी केला.
विजय शिवतारे म्हणाले की, महाविकास आघाडी करण्याआधीच सर्व काही ठरले होते. कोणत्या जागावरील उमेदवार पाडायचे, कोणत्या उमेदवारांना विजयी करायचे हे सर्व आधीच ठरले होते. बहुमताचे आकडे कसे जुळवून आणायचे हा कट निवडणुकीआधी तयार होता, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतर केवळ मविआची घोषणा झाली. मात्र निवडणूक ही त्याच अनुषंगाने लढविण्यात आली होती. आता ही लोकं केवळ सर्वांना फसवत आहेत, असा दावा शिवतारेंनी केला आहे. राज्यात मविआचे सरकार आले तेव्हा हे सरकार जनतेच्या हिताचे नाही असे सर्वांत पहिले मी सांगितले.
सरकार आले तेव्हा मी जवळपास साडेचार तास एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. त्यांना सांगितले की हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंवर प्रेशर टाका आणि आघाडी तोडायला लावा. राज्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले पाहिजे. शिंदेंच्या डोक्यात या उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा देखील विजय शिवतारे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ७० जागा पाडल्या असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसे कामाला लावल्याने शिवसेनेचे मंत्री पराभूत झाले, या सर्व गोष्टींना फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.