Uddhav Thackeray: Don't decide on bow and arrow before Supreme Court verdict

Uddhav Thackeray:सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको

मुंबई ।बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ( Supreme Court verdict) लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी  शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

 उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपुष्टात आला आहे. यावर मातोश्री येथे परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, शिंदे गटावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहनही  उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

 यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे. 

 निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पक्षप्रमुख हे पद मीच तयार केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी या पदावर काम करत आहे.

आता जे सोडून गेलेत, त्यांनीच माझी या पदावर निवड केली आहे.तसेच, शिवसेनेचा  मुख्य नेता हे पदच नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दावा हा घटनाबाह्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या पैशांच्या जोरावर अशा पद्धतीने कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. पैशांच्या जोरावर मुख्यमंत्री बनणे चुकीचे आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)लगावला.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून फुटल्यानंतर शिंदे गटाने एक तर वेगळा पक्ष बनवायला हवा होता किंवा ईडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी भाजपमध्ये विलीन व्हायला हवे होते. मात्र, शिंदे गटाने यापैकी काहीही केले नाही. नियमानुसार त्यांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे आमदार नक्कीच अपात्र ठरतील. तसेच, शिंदे गटाला आता भाजपमध्येही जागा नाही. त्यांची आपापसातच धुसफूस सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाची स्थिती मध्येच लटकल्यासारखी झाली आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

शिवसेना कुणाची यावर भाष्य करताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे. तर, निवडणूक आयोगापुढील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मात्र, आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की, आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्यावा. निवडणूक आयोगाने आमच्याविरोधात निकाल दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालायने गद्दारांना अपात्र ठरवले तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल येऊ द्यावा. त्यानंतरच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निकाल द्यावा.असेही ठाकरे म्हणाले.(Uddhav Thackeray: Don’t decide on bow and arrow before Supreme Court verdict)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *