नागपूर |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केला आहे.
नागपूरमध्ये तोगडिया यांनी हा आशावाद व्यक्त करताना भाजप – शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात,असे विधानही केले. शिवाय अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या निर्माणात अशोक सिंघल, हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे,उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग हेच खरे नायक असल्याचे तोगडिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून तोगडिया यांनी भाजप -शिवसेनेची युती पुन्हा होईल असा आशावाद व्यक्त केला असला तरी त्यांच्या या विधानाला भाजपच्या वर्तुळातून कितीपत सहमती मिळते, हा मुद्दा महत्वाचा असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. राजकारणात कधीही आणि केंव्हाही काहीही होऊ शकते. अशा घटना घडत असतात. आज जे मतभेद दिसत असले, तरी ते विसरून उद्या या दोन्ही पक्षाचे नेते गळाभेटी घेतील असे तोगडिया यांनी म्हटले असले तरी भाजपची नक्की भूमिका काय आणि ते त्यासाठी एक पाऊल पुढे टाकतील आणि हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येतील ही शक्यता धूसर असल्याचे ठाम मत राजकीय जाणकारांचे आहे.