अभिभाषणासाठी सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या 22 सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवले. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, पण त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.
‘त्या’ वक्तव्याचे पडसाद
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.