मुंबई।
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्षही पेटला आहे. शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला. त्यामुळे पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. अशी टीकेची तोफ गीते यांनी डागल्याने त्याला आता राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जरी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पेटला असला तरी गीते आणि तटकरे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे.
श्रीवर्धनमध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ही टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गितेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षाचे नेतृत्वाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आली, तेव्हा तो गळून पडला होता. अलीकडच्या काळात गिते यांची राजकीय अवस्था ’सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी झाली आहे. त्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त वक्तव्य आले आहे. असं मला जाणवत आहे. ते बोलल्याने काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यामुळे अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचे भान राहिले नसेल म्हणून त्या नैराश्यापोटी आलेले ते वक्तव्यं असू शकतील.