Shirur Lok Sabha constituency

Shirur Lok Sabha constituency:’शिरूर’मधील  अस्तित्व आणि वर्चस्वाची  लढाई कुणाच्या पथ्यावर! 

 घडतंय बिघडतंय… प्रवीण पगारे 
शिरूर लोकसभा मतदारसंघाची (Shirur Lok Sabha constituency) यंदाची लढत गाजणार आहे. अस्तित्व आणि वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारतो याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले तरी आगामी काळात ते कुणाच्या पथ्यावर पडणार हे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे गतवेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करण्यासाठी नवखा चेहरा देऊन विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना  निवडून आणले, त्या विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आता जुने मित्र पण राजकीय विरोधक असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी खिंड लढवावी लागणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर वर्चस्वाचे लक्ष्य आणि संभाव्य उमेदवार आढळराव यांच्यासमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान राहणार आहे. एकीकडे प्रचाराच्या झंझावातात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे   शिवाजीराव आढळराव पाटील हे अजूनही संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत ऐनवेळी कोण उमेदवार रिंगणात उतरवला जातो की ‘पानिपत’ला कोण सामोरा जातो  याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 
 
 ३ लाखांनी मतदारसंख्या वाढली 
या मतदारसंघात (Shirur Lok Sabha constituency) जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील लोकसभा निवडणुकीची २०१९ची  आकडेवारी पाहिल्यास महायुतीला ५ लाख ७७ हजार ३४७ तर महाआघाडीला ६ लाख ३५ हजार ७३० अशी एकूण मते मिळाली आहेत.एकूण मतदारसंख्या २१ लाख ७३ हजार ४८४ होती. त्यापैकी १२ लाख ९३ हजार ११७ मतदारांनी मतदान केले. म्हणजेच ५९. ३८ टक्के मतदान झाले. यंदा मात्र या मतदारसंघात ३ लाखांनी मतदारसंख्या वाढली आहे. ती यंदा २४ लाख ७९ हजार इतकी  झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेच्या विचित्र प्रयोगामुळे मतविभाजन मोठ्याप्रमाणावर असल्याने मतदानाचा टक्का किती वाढतो हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यात या मतदारसंघात वंचितला ३८ हजार ०७० मते गतवेळी मिळाली होती. यंदा ती किती वाढतात यापेक्षा महाविकास आघाडीसाठी जमेची ठरणार आहेत. त्यात वंचितची नेमकी भूमिका ही २५ किंवा २६ एप्रिल पूर्वी जाहीर होणार आहे.
 आढळरावांचा प्रवेश कुणाच्या पथ्यावर ? 
निवडणुकीचे वारे वाहण्याआधी या मतदारसंघातून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावरून टीकेच्या फैरीही झाडल्या. ते थांबत नाही तोच दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्यासाठीही या मतदारसंघाची चाचपणी झाली. मात्र विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे श्रेयाचे राजकारण यंदाही गाजणार आहे. गतवेळी या मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नांना प्रचारात प्राधान्य देण्याची रणनीती यशस्वी झाली होती. खुद्द वळसे पाटील यांनीच ही  व्यूहरचना आखली होती आणि ५८ हजार ४८३ मताधिक्य घेऊन अमोल कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव केला होता.सद्यस्थितीत या मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यात कोल्हे यांनी यश मिळवले आहे आणि अभ्यासू खासदार म्हणून संसदेत प्रशंसाही मिळवली आहे.  मात्र यंदा राजकीय उलथापालथ झाली आणि लोकनेते शरदचंद्र पवार यांचे विश्वासू असलेले वळसे पाटील हे राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यात आता ही जागा निवडून आणणे हेच मोठे आव्हान वळसे पाटील यांच्यापेक्षा अजित पवार यांच्यासमोर आहे. गतवेळी पराभव पत्करलेले   आढळराव पाटील  हे संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. नेमकी हीच बाब वळसे पाटील यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. 
वास्तविक या मतदारसंघात (Shirur Lok Sabha constituency) शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे अनेक दिग्गज साहेबांबरोबर गेले असले तरी राष्ट्रवादी नंतर दोन्ही शिवसेना आणि आता राष्ट्रवादीच्या एका गटात प्रवेश करणाऱ्या आढळराव यांच्यावर नाराज असलेली मंडळी ही आगामी काळात वळसे पाटील यांच्याकडे वळणार आहेत. त्यामुळे लोकं सोडून गेली असली तरी शिवसेनेतील नाराज मंडळींचे ‘इनकमिंग’ वळसे पाटील गटात  आपसूक  होणार आहे. त्यात   आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण त्यांना सोईस्कर ठरणार आहे. तसेच यंदाच्या लोकसभेची रणनीती ही आढळरावांचीच असणार आहे.त्यामुळे अजित पवारांना पुत्र पार्थ पवार तर वळसे पाटील यांना कन्या पूर्वा या नवख्या उमेदवारांना येथून रिंगणात उतरविणे महागात पडू शकते हे हेरूनच कोल्हे यांच्यासमोर पुन्हा आढळराव यांनाच उतरविण्याची खेळी खेळली गेली असली तरी विजय कुणाच्या पथ्यावर पडतो.यापेक्षा पराभवाचे खापर कुणावर फोडले जाते  हे नंतर कळणार आहे. सध्या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या  सहा विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल भाजप – १, राष्ट्रवादी – ५ असे आहे. 
 
 घड्याळाचा ( चिन्ह न्यायप्रविष्ट बाब ) ‘गजर’ दबून जाईल का ? 
 वास्तविक खेड, जुन्नर, आंबेगाव या विधानसभा मतदारसंघात वळसे पाटील यांचे काम मोठे आहे. मात्र त्यांना मानणारा मतदारवर्ग मोठा असला तरी येथे साहेबांचा प्रभाव मोठा आहे. असेच चित्र भोसरी, हडपसर आणि शिरूरमध्येही आहे.  वळसे पाटील यांना ओळखणारा मतदार असला तरी जनतेची नाळ ही पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीशी आहे.  त्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, हडपसर येथील माळी समाजाची सव्वा लाख  एकगठ्ठा असलेली मते विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या पारड्यात जाणार हे वास्तव आहे.  त्यामुळे आधीच उमेदवारी जाहीर झाल्याने कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यात त्यांची विश्वासाहर्ता आणखी बळकट झाली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकदा जनतेसमोर जाण्याची संधी मिळणार आहे. त्यात त्यांच्या पक्षात स्थानिक पातळीवर असलेले मनभेद हेच मतांचे गणित बिघडण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या  तुतारीच्या  घुमणाऱ्या आवाजात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचा ( चिन्ह न्यायप्रविष्ट बाब ) ‘गजर’ दबून जाईल का ? हाच मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
 Shirur Lok Sabha constituency  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *