जळगाव |महाराष्ट्र सदन असो किंवा आरटीओ कार्यालयाचे बांधकाम,त्यात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते मात्र मला नाहक त्यात अडकवण्यात आले. भाजपचे सरकार असताना माझ्याविरोधात जे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले,त्यावर निकाल देताना न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दोषारोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे,ही बाब माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे,अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यावेळी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अध्यक्ष शरद पवार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, मी निर्दोष आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळात मला वरचा क्रमांक मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
जळगाव दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते. म्हणूनच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र माझ्याविरोधात ज्यांनी चुकीचे आरोप केले.,त्यांच्याबाबतीत नियती बघेल. मी सर्व निर्मिकावर सोडून देत असतो. माझ्यावर ज्यांनी खोटे आरोप केले.मला नाहक त्रास दिला, त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात निश्चितच होईल असेही ते म्हणाले.