मुंबई।शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता निवडणूक आयोगानेही (election commission) धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. त्यात पहिला धक्का शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला. तर आता दुसरा धक्का म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच ( Kasba and Chinchwad by-elections.)वापरता येणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता समता पक्षानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेत मशाल चिन्ह आपल्याला द्यावे, अशी मागणी केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास झा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. त्यामुळे आता आमचे मशाल चिन्ह आम्हाला द्यावे, असे म्हटले आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मशाल हे चिन्ह आणि सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव कायम ठेवावे, अशी मागणी ते करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला अजून एक धक्का दिला आहे. त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाने तशी ऑर्डरच काढल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले. आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीही हेच चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली होती.