Thackeray group's challenge to the Modi government: Javed Akhtar showed what a 56 inch chest is!

Thackeray group’s challenge to the Modi government: 56 इंचांची छाती काय ते जावेद अख्तर यांनी दाखवले!

मुंबई। शायर फैज अहमद फैज यांच्या लाहोरमधील स्मृती समारोहात कवी-गीतकार, लेखक जावेद यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावल्याबद्दल  ठाकरे गटाने (Thackeray group’s) जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, यावरुन भाजप व संघ परिवारालाही ( BJP and the Sangh Parivar)टोला लगावला आहे.

मुखपत्र  सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कधीकाळी लाहोरवरही तिरंगा फडकत होताच. शायर फैज अहमद फैज यांच्या लाहोरमधील स्मृती समारोहाच्या निमित्ताने जावेद अख्तर महोदयांनी तो पुन्हा फडकवला. संघ परिवारातील, भाजपवाल्यांतील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी. फुकटचे बुडबुडे इकडे बसून फोडू नयेत. 56 इंचांची छाती काय ते जावेद अख्तर यांनी दाखवले. त्यांचे खास अभिनंदन.

 एका मुस्लिम धर्मीय लेखक-कवीने मोदी व त्यांच्या अंधभक्तांना जमले नाही ते पाकिस्तानात घुसून करून दाखवले. ज्येष्ठ कवी-गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात घुसून पाकडय़ांवर हल्ला केला. शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाहोरमधील उत्सवात जावेद अख्तर हे निमंत्रित होते. अख्तर यांनी संधीचा योग्य लाभ घेतला व यजमानांना खडे बोल सुनावले.

अख्तर यांनी व्यासपीठावरूनच पाकड्यांना सुनावले की, ‘‘मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही आमच्या शहरावर झालेला हल्ला पाहिला आहे. हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते, ते तुमच्याच देशातून आले होते. त्याबद्दल भारतीय लोकांची तक्रार असेल तर पाकिस्तानी लोकांनी अपमान वाटून घेऊ नये.’’ पाकिस्तानात जाऊन असे ‘खाडकन’ वाजवून बोलणे सोपे नाही.असेही अग्रलेखात म्हटले आहे.

आम्ही सोडून इतर सगळे देशद्रोही या विषारी प्रवृत्तीस चपराक

इकडे दिल्ली आणि मुंबईत बसून पाकिस्तानला दम भरणे सोपे आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून ‘‘घुस के मारेंगे’’ अशा गर्जनाही होत असतात, पण शत्रूच्या गुहेत शिरून, ‘‘तुम्हीच आमच्या देशाचे हल्लेखोर आहात. सहन कसे करायचे?’’ असे तोंडावर बोलणाराच सच्चा देशभक्त असतो. अख्तर यांनी असेही सांगितले की, ‘‘नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन, गुलाम अली यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे भारतात आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दीच गर्दी झाली, पण पाकिस्तानात लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम कधी आयोजित झाला नाही.’’ जावेद अख्तर यांनी ही जाणीव करून देताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. टाळय़ा वाजवून अख्तर यांना दाद देणाऱ्या श्रोत्यांच्या हिमतीचेही कौतुक करावे लागेल.

अख्तर यांनी देशभक्ती व हिमतीची एक ‘मिसाल’ देशासमोर ठेवली. आम्ही सोडून इतर सगळे देशद्रोही या विषारी प्रवृत्तीस जावेद यांनी चपराक मारली आहे. पाकिस्तानच्या श्रोत्यांनी व तेथील आजच्या राज्यकर्त्यांनी जावेद यांचे वक्तव्य सहन केले हे विशेष, पण आपल्या देशात अशी सहनशीलता व संयम आज उरला आहे काय?असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

चीनचे नाव घ्यायला घाबरतात

अग्रलेखात म्हटले आहे की, निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान असे बखेडे उभे करायचे. गोवंश रक्षणाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम तरुणांना जाळायचे, पण भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे नेते, मंत्री ‘‘आम्ही गोमांस भक्षक आहोत,’’ असे जाहीरपणे बोलत असतात, त्यांच्यावर डोळे वटारायची हिंमत नाही. पाकिस्तान हा देशाचा शत्रू आहे तसा तो चीनही आहे, पण मोदी फक्त पाकिस्तानला दम भरतात व चीनचे नाव घ्यायला घाबरतात ही वस्तुस्थिती आहे. काही चिनी ‘ऍप्स’ वगैरेंवर बंदी घातली की, मोदी सरकारचे चीनविरुद्धचे ‘धाडस’ संपते.

राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना धक्का

 पाकिस्तान आणि भारतातील सर्वसामान्य मुसलमानांविरोधात मात्र हे लोक सर्रास वातावरण निर्माण करतात. कारण ते सोपे आहे आणि त्यावर यांना त्यांच्या राजकीय पोळय़ाही भाजता येतात. अशा राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना जावेद अख्तर यांनी थेट लाहोरमध्ये जाऊन धक्का दिला.(Thackeray group’s challenge to the Modi government: Javed Akhtar showed what a 56 inch chest is!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *