पुणे |प्रवीण पगारे
राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या ‘परंपरे’ला यंदा मात्र कायमचा छेद मिळाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही पारदर्शकतेचा पायंडा सुरु केल्याने अधिकारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तर ज्या व्यक्ती आधीच ‘यादी’ सादर करायचे, त्यांचे धाबे दणाणले असून बदल्यांमधील स्वार्थकारणाचा कारभारही आता संपुष्टात आला आहे.
राज्यातील अति वरिष्ठ किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत यापूर्वी मंत्रालयात काही ठराविक व्यक्तींकडे ‘कंत्राट’ असायचे. गेले अनेक वर्षे हा कारभार सुरु होता.ती एक ‘परंपरा’च ठरली होती. बदल्यांचे आदेश निघण्याआधी एका व्यक्तीकडून आधीच एक यादी समोर यायची. त्यानंतर अधिकृत यादी जाहीर झाल्यावर केवळ नाममात्र एक दोन नावे वगळता ‘त्या’ व्यक्तीने बदल्यांबाबत आधीच तयार केलेल्या यादीनुसारच नावे असायची. परिणामी ‘त्या’ व्यक्तीचा दबदबा निर्माण झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव ‘त्या’ व्यक्तीकडे ‘फिल्डिंग’ लावावी लागत असे. पण या प्रक्रियेला अनेक अधिकाऱ्यांचा विरोध होता आणि तशी चर्चाही अधिकारी वर्गात कायम असायची;पण तक्रार करूनही दाद मिळत नसायची. ‘माध्यम’ म्हणून अधिकाऱ्यांसमोर आधीच सादर केलेली यादी एक – दोन नावे वगळता,आहे तशी येत असल्याने या प्रकाराबद्दल अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नापसंती होती ;पण गृहमंत्रालयात मात्र ‘त्या’ व्यक्तीला खूप पसंती आणि ते एक प्रभावी ‘माध्यम’ असा हा कारभार गेल्या १५ वर्षांपासून सुरु होता. या बदल्यांच्या प्रक्रियेबाबत अनेक कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचे आक्षेप होते. मात्र गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले आणि त्या प्रक्रियेत हा पूर्वीपासून सुरु असलेला कारभार कचाट्यात सापडला.अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सुरू असलेल्या या ‘परंपरे’ला पूर्णविराम मिळाल्याने अधिकारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.