नांदेड|
बातमी कशी होईल, यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरूच असल्याचे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. चित्रपट चालवण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटते किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रामध्ये भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु असल्याचे मलिक यांनी नांदेड येथे माध्यमांसोबत बोलताना म्हटले.
सध्या राजकारणात पातळी सोडून एकमेकांवर टीका करण्याची मालिकाच सुरु असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नरेंद्र मोदींबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद पेटलेला असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कथित भ्रष्टाचार उघड करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर नवाब मलिक यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
याआधी बोलताना किरीट सोमय्या यांनी मला नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ द्यायचे असल्याचे म्हटले होते. मला काहीतरी भेट/बक्षीस (गिफ्ट) नवाब मलिक यांना द्यायचे आहे. गेल्या महिन्यात त्यांनी असे काही सांगितले की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली, याची चौकशी करणार आहोत. खरे म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले आहेत. मी आज जाऊन ते कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीकडे गेली कशी याची चौकशी झाली पाहिजे, असे किरीट सोमय्या म्हणाले होते.त्यानंतर मलिक यांनी सोमय्या यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. परिणामी आता त्याला सोमय्या हे काय प्रत्युत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
