मुंबई :
विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतीत काही उद्योजकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्याला भविष्यकाळात गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल तसेच रोजगारावरही गदा येईल अशी भीती फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसह राज्यातील अनेक ठिकाणी वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत. औरंगाबादमधील एका उद्योग समूहात गुंडानी दहशत निर्माण करून मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.असे अनेक प्रकार घडत आहेत. ते वेळीच रोखले नाही तर महाराष्ट्राबाहेर राज्याची प्रतिमा खराब होईल परिणामी बाहेरील गुंतवणुकीपासून आपल्याला वंचित राहावे लागेल तसेच रोजगारावरही गदा येईल. त्यामुळे कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी दडपशाही करणाऱ्या या प्रवृत्तीवर वेळीच कारवाई करावी अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.
दोन घटनांचा उल्लेख
औरंगाबादमधील भोगले समूहात १०ते १५ गुंडानी येऊन व्यवस्थापकासह कामगारांना मारहाण केली होती. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे तर काहीजण अद्याप फरार आहे. लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी असाच प्रकार वाळुंज एमआयडीसीमध्ये श्री गणेश कोटिंग समूहातही घडला होता या दोन घटनांचा उल्लेख फडणवीस यांनी पत्रात करून गेल्या ९ महिन्यांपासून हल्ले होण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.