पुणे |कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे आहे. ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.
मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर दिले आहे.
सोमय्या हे फक्त एक हत्यार आहे, प्रत्यक्षात खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. शिवाय पाटील यांनीच आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. पाटील म्हणाले, आरोप झाल्यामुळे मुश्रीफ हे विचलित झाले आहेत. त्यांनी पॅनिक होऊ नये, शांत डोक्याने काम करावं आणि आपली ड्रामेबाजी थांबवावी.आम्ही मेरीटवर पक्षात प्रवेश देतो. त्यामुळे मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची कुठलीही ऑफर मी दिली नव्हती. मी सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आहे. कशाचाही मास्टर माईंड नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.