पुणे| पुणे महागरपालिकेवर आगामी सत्तासमीकरणांसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीतच ‘सामना’ होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण केले जात असले तरी, राज्यातील सत्तेच्या जोरावर शिवसेनेनेही कंबर कसली आहे. गत वैभव प्राप्त करण्यासाठी शिवसेनेने मतदारसंघनिहाय ताकद कशी वाढेल, याकडे लक्ष केंद्रीत केल्याने यंदा शिवसेनेची पालिकेतील सदस्यसंख्या वाढण्याला पोषक स्थिती असल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदविले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर झाला असला तरी त्यात आता निवडणूक आयोगाने बहुतांश ठिकाणी बदल सुचवले आहेत. त्यामुळे ते बदल करून प्रभाग रचना सादर होईल आणि नंतर ती प्रसिद्ध होईल. मात्र निवडणूक आयोगाला सादर केलेला कच्चा प्रभाग रचनेचा आराखडा आता वादात सापडला आहे आणि त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश काय येतात याकडे प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असले तरी भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ते महत्वाचे आहे. एकीकडे दुहेरी सामना असे चित्र यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी निर्माण केले जात असले तरी खरी लढत ही चौरंगी होणार असल्याचे संकेत आहेत. जर महाविकास आघाडीतून लढण्याचे ठरले तर मात्र चित्र वेगळे राहील. हीच शक्यता गृहीत धरून शिवसेनेने पुन्हा ताकद कशी वाढेल यावर भर दिला आहे. मुख्यत्वे शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याची रणनीती शिवसेनेची आहे. त्यानुसार जुन्या शिवसैनिकांवर कामगिरी सोपविण्यात आली आहे. पुणे महापालिकेसाठी यापूर्वी २००७ मध्ये एकच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती.या पार्श्वभूमीवर त्यावेळची मतांची टक्केवारी पाहिल्यास निवडून आलेले उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकांची मते मिळविणाऱ्या उमेदवारांची तुलना केल्यास त्यात काँग्रेससह मनसे आणि शिवसेनेला यंदा जमेची बाजू ठरणार असली तरी यंदा तीन सदस्य प्रभाग पद्धत पाहता, त्यात शिवसेनेलाच संधी जास्त राहणार आहे. काँग्रेसची अवस्था तशी बिकट राहणार आहे. कारण महाविकास आघाडीतून लढलो तरच टिकू असा व्होरा स्थानिक नेत्यांचा आहे आणि सारी भिस्त ही राष्ट्रवादीवर आहे. मात्र शिवसेनेला राजकीय आखाड्यात पुन्हा ताकद दाखविण्यासाठी सुसंधी मिळाली आहे. ती यशस्वी कशी होईल हेच लक्ष्य सेनेचे आहे. त्यामुळे संघटनात्मक बांधणीवर सेनेचा सध्या भर आहे.त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेल्या शह -काटशहाच्या राजकारणापासून अलिप्तपणाची भूमिका ठेवून सेनेची वाटचाल सुरु आहे. कारण एकेकाळी पालिकेवर पुणे पॅटर्नच्या माध्यमातून सत्ता भोगलेले हे पक्ष आहेत. त्यामुळे आगामी सत्तासमीकरणात जर नवीन कोणता पॅटर्न करायच्या झाल्यास प्रमुख सूत्रधाराची भूमिका कोणाची,हा मुद्दा लक्षात घेऊनच आपले प्राबल्य कसे वाढेल याकडेच शिवसेनेचा भर आहे. त्यात यंदा भाजपमध्ये नाराजांची संख्या मोठी असणार आहे आणि पक्षांतराचे प्रमाणही मोठे राहणार आहे. त्यात राष्ट्रवादीने आधीच भाजपसह काँग्रेस मधील जुन्यांचा प्रवेश करून घेतला असला तरी, भाजपमधून ऐनवेळी होणारे पक्षांतर हे शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे. भाजपमधील जे जे नाराज असतील ते शिवसेनेलाच पसंती देतील. साहजिकच शहराच्या ज्या प्रभागांत सक्षम उमेदवार सेनेकडे नसतील,तिथे भाजपमधील नाराजांना उमेदवारी दिल्यास मतांचे समीकरण सहज साध्य होईल. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा ‘सामना’ रंगत असला तरी ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ याचा खरा फायदा शिवसेनेलाच होणार आहे.असा अंदाज राजकीय अभ्यासकांचा आहे.