मुंबई ।शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची (Shiv Sena-Vanchit alliance)घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) संयुक्त पत्रकार परिषदेत केल्याने राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.परिणामी त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून मतविभाजनात भाजपसह रिपाईची (BJP-RPI )कोंडी होणार आहे.
मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.सध्या देशात न्यायालये, तपास यंत्रणा सर्वांवरच दबाव आहे. नुकतेच कायदामंत्री किरण रिजीजू म्हणाले की, न्यायालयांमध्येही लोकप्रतिनिधींनी नियुक्त केलेले न्यायाधीश असावेत. केंद्रीय कायदामंत्र्यांचे हे वक्तव्य संविधानाला अनुसुरुन आहे का? यालाच लोकशाही म्हणायचे का?असा सवाल ठाकरे यांनी केला. तर, प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी देशात जातीवादी राजकारण करत आहेत. 2002 ची एक बीबीसीची डॉक्युमेंट्री नरेंद्र मोदींना आता सहन होत नाही. या माहितीपटावर बंदी घातली जात आहे. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. मात्र, मोदींचे नेतृत्वही एक दिवस संपुष्टात येईल.
युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार एकत्र आले आहेत.
महाविकास आघाडीत…
वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेने युती केली असती तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो.असे ते म्हणाले. (Shiv Sena-Vanchit alliance: RPI dilemma with BJP in vote division! )
आठवले यांच्या राजकीय अस्तित्वाचीही कसोटी:या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवेसना-वंचितचे जागावाटपाचे गणित नीट जमले तर, भाजपपुढे आव्हान उभे करु शकतात. त्याचबरोबर ठाकरे-आंबेडकर युती दहा वर्षांपूर्वी शिवशक्ती-भीमशक्तीची पायाभरणी करणारे. केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या राजकीय अस्तित्वाचीही कसोटी घेणारी ठरणार आहे.