मुंबई । शिवसेना (SHIVSENA) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पुकारलेले बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बंड ठरले आहे.इतकेच नाही तर त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनाच आव्हान दिले आहे. ३६ हून जास्त आमदारांना सोबत घेत त्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेसोबत आता १३ आमदार उरले आहेत. अशात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)यांनी बंडखोर आमदारांना शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे,तुम्ही २४ तासात परत या असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार आता पेचात अडकण्याची चिन्हे आहेत. परिणामी बंडखोर गटाला सुरुंग लागण्याची दाट चिन्हे आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
सगळ्या बंडखोर आमदारांना माझे सांगणे आहे की तुम्ही तिकडे बसून पत्रव्यवहार, व्हॉट्स अॅप या सगळ्याद्वारे संपर्क साधू नका. मुंबईत या समोरासमोर बसा. तुमचं काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडा. महाविकास आघाडीबाबत समस्या तुम्हाला असतील तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड सर्वात मोठे बंड मानले जात आहे.बंडानंतर उद्धव ठाकरे यांनीही भावनिक साद घालत ज्या काही तक्रारी असतील त्या समोर या आणि सांगा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.नेमके त्यापाठोपाठ पुढच्या २४ तासात मुंबईत या आणि चर्चा करा महाविकास आघाडीतून बाहेर पडू ही ‘ऑफर’ संजय राऊत यांनी दिली आहे.परिणामी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा गट आता पेचात सापडणार आहे. ज्यावेळी बंडखोरी केली,त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस पक्ष नको अशी भूमिका या बंडखोर आमदारांनी घेतली होती मात्र आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यादृष्टीने सकारात्मकता दर्शविल्याने कोंडीत कोण अडकतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ पत्रामुळे…
शिवसेनेला (SHIVSENA )हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या नेत्यांना बडवे आणि कारकून चाणक्य असे म्हणत संजय शिरसाट यांनी गेल्या अडीच वर्षांपासून घडत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. त्यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली असून हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. तसेच आमदारांचे म्हणणे हेच आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह सगळ्याच बंडखोर आमदारांना ही ‘ऑफर’ दिली आहे.(Shiv Sena: Out of Mahavikas front … Now the dilemma of rebel MLAs!)