Shiv Sena: Like Mumbai, Gujarat can contribute to the development of Uttar Pradesh!

Shiv Sena: उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबईप्रमाणे गुजरातही भर टाकू शकेल!

मुंबई ।योगी महाराजांनी त्यांच्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईबरोबरच बाजूच्या गुजरात राज्यातही जायला हवे व गुंतवणूकदारांना लखनौच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी गांधीनगरच्या रस्त्यावर एखाद्या भव्य रोड शोचे आयोजन का करू नये? मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक मोठे उद्योग गुजरातेत पळवून नेले व जगभरातील गुंतवणूकदारांना केंद्र सरकार सध्या फक्त गुजरातचाच रस्ता दाखवते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबईप्रमाणे गुजरातही भर टाकू शकेल. महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन, एअर बस, आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र यांसारखे मोठे प्रकल्प जोरजबरदस्तीने गुजरातेत पळवले. योगी यांच्या एखाद्या रोड शोने गुजरातमधील एखादा प्रकल्प उत्तर प्रदेशात म्हणजे एक्सप्रेस प्रदेशात गेला तर आम्हालाही आनंदच होईल. योगी सारखे मुंबईत येतात. त्यांना मुंबईचे वेड लागले आहे हे चांगलेच आहे.अशा शब्दात शिवसेनेने (Shiv Sena)  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांच्यावर टीका केली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये​ अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अशा रोड शो ची गरज आहे का? या माध्यमातून भाजप मुंबईत शक्तीप्रदर्शन आणि राजकारण करू पाहत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ​​​​​​शिवाय योगीजी तुम्हाला उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे, तेव्हाही इंधन लागेलच​ असा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नित्यनेमाने मुंबई शहरात अवतरले. मुंबईतील उद्योगपती, गुंतवणूकदारांनी त्यांच्या राज्यात उद्योग सुरू करावेत यासाठी या भेटीगाठी आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासास गती मिळावी म्हणून योगी महाराज वरचेवर मुंबई शहरात पधारत असतात. त्यात काही चूक आहे असे वरकरणी आम्हाला वाटत नाही. बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये औद्योगिकदृष्टय़ा मागास आहेत व त्या राज्यांतील मोठी लोकसंख्या रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाली. मुंबई-दिल्लीत या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एका कळकळीने योगी आदित्यनाथ हे मुंबईस येतात, पण या वेळी येण्याआधी त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती देऊन स्वतःची व आपल्या राज्याची प्रसिद्धी केली. ‘उत्तर प्रदेश हे नवीन भारताचे विकास इंजिन आहे. हे इंजिन तुमच्या व्यवसायाला नवीन वेग देणार,’ असे या जाहिरातीत म्हटले आहे.उत्तर प्रदेश हा ‘एक्सप्रेस प्रदेश’ असून 6 एक्सप्रेस वे, 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असल्याची माहिती योगींनी त्यांच्या जाहिरातीत दिली. उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे व त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले.

मुंबईतील बडय़ा उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले व त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय? ताजमहल पॅलेस या कुलाब्यातील हॉटेलजवळ उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासासाठी योगी रोड शो करणार असल्याचे प्रसिद्ध झाले, पण प्रत्यक्षात हा रोड शो खरेच झाला काय? योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा, म्हणजे गुंतवणूक केली यावर सुद्धा प्रसिद्धी होऊ द्या.उद्योगपतींना भेटणे, आपल्या राज्याच्या उद्योगविषयक धोरणांबाबत प्रेझेंटेशन देणे वेगळे व त्या उद्योगपतींना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत रोड शोचे आयोजन करणे वेगळे. योगींचा मुंबईतील रोड शो हा भाजप पुरस्कृत राजकीय खेळ असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.

उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे. आजच आम्ही वाचले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नासेक लोकांची वरात डावोस येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेस निघाली आहे. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे बिऱहाड त्यांची वरात घेऊन निघाले आहे. डावोस येथे 16 जानेवारीपासून जागतिक गुंतवणूक परिषद होणार आहे. या माध्यमातून 60 ते 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याची तयारी महाराष्ट्रातील या बिऱहाडाने केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे बिऱहाड डावोसला जाऊन गुंतवणूकदारांच्या गाठीभेटी घेईल.गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी डावोसच्या रस्त्यांवर रोड शो नक्कीच करणार नाहीत, हे मुंबईत रोड शो करणाऱ्या योगी महाराजांनी समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्री योगी हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत. महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्याने वागून त्यांनी स्वतःची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबई-महाराष्ट्राने नेहमीच योगदान दिले आहे. मुंबईत लाखो हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी येऊन चांगल्यापैकी स्थिरावले व त्यांच्याच अर्थकारणावर उत्तर प्रदेशात लाखो चुली पेटत आहेत याचा महाराष्ट्रास सार्थ अभिमान आहे. शेवटी देश व समाज म्हणून आपण एक आहोत. उत्तर प्रदेशचा विकास मुंबई निवासी उद्योगपती करणार असतील तर ते चांगलेच आहे. त्यामुळे मुंबईवरील लोकसंख्येचा भार हलका होत जाईल.

योगींसारख्या संत पुरुषांची पावले मुंबईस लागणे हे मंगलमय आहे, पण त्या पावलांनी त्यांच्या राज्याच्या विकासासाठी गुजरात भूमीवरही वळावे. महाराष्ट्राचे अडीच लाख कोटी गुंतवणुकीचे नुकसान आधीच झाले आहे. दोन लाख लोकांचा रोजगारही बुडाला. हे सर्व रोजगार व गुंतवणूक गुजरातेत वळवण्यात आली. मुंबईच्या बाबतीत ही अशी लांडगेतोड सुरू आहे. तरीही ‘अतिथी देवो भव’ या नात्याने योगींचे स्वागत आहे, पण मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा. योगीजी हे भगव्या वस्त्रांतील सत्पुरुष आहेत, पण त्यांच्यात एक राजकारणीही दडला आहे. योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच आहे. तेव्हाही इंधन लागेलच असेही शिवसेनेने म्हटले आहे. (Shiv Sena: Like Mumbai, Gujarat can contribute to the development of Uttar Pradesh!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *