मुंबई|
आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. लोकशाही आहे ,म्हटल्यावर चर्चा तर होणारच; पण केवळ चर्चा पे चर्चा नको,तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची बैठक नुकतीच पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे आहे.या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने ही भूमिका मांडली आहे. ‘मोदी नामा‘ ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी आणि रंगीत तालीम विरोधकांना करावी लागणार आहे; अन्यथा जन आशीर्वादाच्या जत्रा लोकांना गुंगीच आमंत्रण देऊन पुढे निघून जातील. असा इशाराही अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.
मोदी सरकारने सध्या जन आशीर्वाद यात्रेतून मंत्र्यांची फौजच उतरवली आहे. यावर शिवसेनेने भाष्य करताना म्हटले आहे की , मोदी सरकारच्या जन आशीर्वाद जत्रेत फक्त विरोधकांच्या विरोधात शिव्या शाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद यात्रेतील अर्धे मंत्री हे विचाराने – आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. जे काल – परवा भाजपात घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले, असे उपरे भाजपचा प्रचार करत फिरत आहेत. दुसरीकडे वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते मात्र या जत्रेत येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत. अशी टीकेची तोफही शिवसेनेने जन आशीर्वाद काढणाऱ्या नेत्यांवर डागली आहे.
विश्वास द्या…
आज देशात शेतकऱ्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे. महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे. पेगासीसचे गांभीर्य अजूनही सरकार समजून घेत नाही. मात्र कधी तालिबान्यांचे भय निर्माण करायचे तर कधी पाकड्यांची भीती घालून लोकांची मने तापवायचे. असा भावनांचा खेळ करणारे हे मोदी सरकार हिंदुस्थानात ‘ मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारत माता की जय‘ हे असे उठवळ प्रचार करणाऱ्या जत्रा मंत्री संत्री करीत आहेत. त्यामुळे या सगळ्या नौटंकीविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येणे म्हणजे चर्चांची गुराळे पाडणे नाही तर लोकांना पर्यायच हवा आहे. तो देण्याची क्षमता आपल्यात आहे, असा विश्वास समस्त विरोधी पक्षांनी जनतेस द्यावा लागेल असेही शिवसेनेने नमूद केले आहे.