कोल्हापूर।शिवसेनेत फूट पडली ही वस्तुस्थिती असली तरीही राज्यभरातील कट्टर शिवसैनिक अजूनही शिवसेना (Shiv Sena) (उद्धव ठाकरे गट) आणि कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर पक्षाचे काही खासदार आणि मोठ्या संख्येने आमदार शिंदे गटाकडे गेले आहेत. मात्र, पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असलेला गावोगावचा कट्टर शिवसैनिक अजून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मी सातत्याने राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत असतो. कट्टर शिवसैनिकांच्या निष्ठा बदललेल्या नाहीत. ते उद्धव यांच्याच नेतृत्वावर निष्ठा ठेवतात, असे त्या दरम्यान वेळोवेळी दिसून आले आहे, असा दावा पवार यांनी केला.
सत्ता हातात आल्यानंतरही आपले पाय जमिनीवर ठेऊन जनतेच्या हिताची कामे करायची असतात. मात्र, सत्ताधारी पक्षांकडून या मूलभूत तत्वांचे पालन केले जात नाही आणि ही चिंता करण्यासाठी बाब आहे, असेही पवार यांनी नमूद केले.
राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्या पदाचा काही आब, सन्मान आहे. मात्र, राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अनावश्यक विधाने करतात. त्यामुळे वाद आपल्या अंगावर ओढवून घेतात आणि टीकेचे लक्ष्य होतात, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या भारत जोडो यात्रेच्या सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाने त्याच्यावर टीका केली. खरे तर त्यांनी यात्रेची टिंगल केली. खिल्ली उडवली. मात्र, या यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेकडून राहुल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप तोंडघशी पडला आहे, अशी टीका पवार यांनी केली. भारत जोडो यात्रा केवळ काँग्रेसची यात्रा नाही. या यात्रेत विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. सर्वसामान्य नागरिकही आले. यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती राहुल यांना मिळत आहे. त्यांची स्वीकारार्हता वाढली आहे, याबाबत वाद होऊ शकत नाही, असे पवार यांनी सांगितले.
मुंबईतील आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीत आघाडीबाहेरच्या समविचारी निधर्मी पक्षांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाती पातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. पवार यांनी या आरोपाचा इन्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांची यादी पहिली तरी त्यात छगन भुजबळ आहेत. त्यात मधुकरराव पिचड आहेत. आम्हाला सगळ्या जातींची नवे घ्यायची नाहीत. मात्र, एवढ्यावरूनच राष्ट्रवादीचे धोरण लक्षात येईल, असे पवार म्हणाले.