Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

‘सग्या सोयऱ्यांसाठी’ काँग्रेस नेत्यांची ‘सेटलमेंट’!

पुणे| 
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एरवी एकमेकांविरोधात असलेल्या शहर काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी भाजपशी छुपे संगनमत करून स्वतः सह त्यांचे राजकीय वारसदारांसाठी प्रभाग सुरक्षित केल्याची कुजबुज काँग्रेसभवनमध्ये होत असली तरी आवाज कोण उठवणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावत असल्याचे वास्तव आहे. 
यंदा पुणे महापालिकेची निवडणूक ‘मिनी विधानसभा’च्या धर्तीवर ही निवडणूक होत असली तरी पूर्वाश्रमीचे मातब्बर पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर त्यांचा   विजय निश्चित आहे. कारण बहुतांश नव्या संभाव्य प्रभागात त्यांना मानणारा मतदारवर्ग मोठा असल्याने ती जमेची बाजू ठरणार आहे. त्यात काँग्रेसच्या विद्यमानांसह माजी लोकप्रतिनिधींना  सर्वाधिक संधी प्राप्त होऊ शकते आणि ते पुन्हा सभागृहात दाखल होऊ शकतात.अशी अनुकूल परिस्थिती आहे.त्यामुळेच या संधीचे सोने करण्याबरोबरच, घरातील राजकीय वारसा पुढे सुरु रहावा यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा कल हा महाविकास आघाडी करून लढण्याकडे होता. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांचे नवीन चेहऱ्यांना संधी देताना पक्ष संघटन बळकटीकरण यासाठी स्वबळाचे धोरण होते आणि अजूनही आहे. नेमकी प्रदेशाध्यक्षाच्या विरुद्ध भूमिका असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या मुलांमुलींसाठी संभाव्य प्रभागाची चाचपणी करून तशी तयारीही चालवली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जोरावर  अनुकूल प्रभाग रचना करवून  स्वतःसह मुलामुलींसाठी ‘तरतूद ‘ करण्याच्या  मनसुब्यांवर राष्ट्रवादीच्या हव्यासामुळॆ  पाणी फिरले गेले. त्यामुळे एरवी एकमेकांविरोधात असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मतभेद विसरून एकत्र आले आणि आपल्या  राजकीय वारसदारांसाठी ‘वहिवाट’ तयार करण्यासाठी भाजपशी बोलणी केली आणि राष्ट्रवादीकडून मिळालेल्या वागणुकीचा बदला घेताना पक्षाऐवजी स्वार्थ साधला. जिथे भाजप प्रभावी नाही,तिथे काँग्रेसला मदत अशी ‘सेटलमेंट’ केल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. प्रारंभी राष्ट्रवादीवर भिस्त असलेल्या या काँग्रेसच्या नेत्यांनी आता भाजपच्या ‘ कुबड्यां’चा आधार   घेतला आहे मात्र तो केवळ आणि केवळ स्वतः बरोबर   घरातील भावी पिढीसाठी हा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे.भाजपने वरिष्ठ पातळीवरून दबाव टाकून प्रारूप प्रभाग रचनेत हवे तसे  प्रभाग करून घेतल्याची चर्चा असली तरी काँग्रेसच्या पाच विद्यमानांनी स्वतःसह त्यांच्या मुलामुलींसाठीही  प्रभागाची ‘ तजवीज ‘ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील लोकसभा असू द्या अथवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी आघाडी धर्म पायदळी तुडवत भाजपला  मदत करून ‘ सेटलमेंट’ केली होती. त्याचीच परतफेड त्या -त्या काँग्रेसच्या माननीयांसाठी भाजप करत  आहे.वेळ पडली तर मुलांसाठी  भाजपकडून उमेदवारी हे ‘गणित’ही आतापासून होत आहे. 
निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी करायचे काय
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या मुलांसाठी  पर्वती विधानसभा मतदारसंघात २, कसबा विधानसभा
मतदारसंघात २, पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ३ अशी  प्रभागांसाठी तजवीज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत पालिकेत काँग्रेसची   सदस्य संख्या पाहता,त्यात आणखी तीन सदस्य निवडून येतील. परिणामी काँग्रेसचे सदस्य संख्या वाढेल असा दावाही सूत्रांचा असला तरी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी करायचे काय, हाच मुद्दा काँग्रेसच्या वर्तुळात गाजणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!