पुणे।
उत्पन्नवाढीच्या नावाखाली भाजपकडून शहरातील अँमेनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचे धोरण हे केवळ आणि केवळ विकसकांसाठीच आहे. उत्पन्नाचे खोटे आकडे दाखवून गोंडस आभासी वातावरण भाजप निर्माण करत आहे.जर उत्त्पन्नवाढीसाठी इतके प्रेम भाजपचे उफाळून येत असेल तर अँमेनिटी स्पेसच कशाला, अख्खे पुणे शहर विकायला काढा. अशा शब्दात काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवाय पुणेकरांच्या हितासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे की, अँमेनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचा सत्ताधारी भाजपने घेतलेला निर्णय हा पुणेकरांच्या हिताचा अजिबात नाही. वास्तविक जनतेच्या हिताचे अनेक प्रकल्प या अँमेनिटी स्पेसवर राबवता येऊ शकतात.मात्र असे असतानाही उत्त्पन्नवाढीचा आधार घेऊन, त्या गोंडस नावाखाली भाजपकडून फक्त व्यावसायिक, विकसक यांचे हित जोपासण्यासाठी अँमेनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे उत्त्पन्न मिळेल असा आभास निर्माण केला जात आहे,हे पुणेकरांच्या हिताचे नाही.
दीर्घकाळ सत्तेत असल्यापासून काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या हितासाठी अँमेनिटी स्पेस राखून ठेवलेल्या आहेत. जर त्या- त्या अँमेनिटी स्पेसवर आरक्षण नसले तरी तिथे विविध नागरी हिताचे प्रकल्प उभारणे सहजशक्य आहे. अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. या अँमेनिटी स्पेसचा उपयोग ना गरीहितासाठी करण्याऐवजी भाजपने व्यावसायिक, विकसक यांना ३० वर्षे भाडेकराराने देण्याचे राबविलेले धोरण शहराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे.
रेव्हेन्यू कमिटीला का चालना दिली नाही…
सत्तेत असणाऱ्या भाजपने पाच वर्षात शहरात संधी असतानाही कोणताही मोठा प्रकल्प साकारलेला नाही.सद्यस्थितीत शहर खड्डेमय असतानाही, कुठे खड्डे ? असा खोटारडेपणा भाजप करत आहे, असे नमूद करून आबा बागुल म्हणाले, उत्त्पन्न वाढीसाठी रेव्हेन्यू कमिटीची मी आग्रही मागणी केली. कमिटी स्थापनही झाली;पण या रेव्हेन्यू कमिटीचे काम पूर्णपणे ठप्प करून उत्पन्न वाढीचे मार्ग शोधण्याऐवजी हितसंबधितांना, विकसकांना मालामाल करण्यासाठीच अँमेनिटी स्पेस 30 वर्षासाठी देण्याचा डाव बहुमताच्या आधारे मंजूर केला गेला, याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.