मुंबई । किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जामिनावर बाहेर आहे आणि तो आमच्यावर आरोप करतोय. पोलिस चौकशीला आले की लपून बसतो. मी आता या सोमय्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा लवकरच सर्वांसमोर आणणार आहे. त्यांनी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला. म्हणजे पैसा कसा खायचा ? खोटी बिले कशी सादर करायची ? ते बघा. त्यांच्या मिसेसच्या नावाने सौ. सोमय्या यांची युवा प्रतिष्ठान ही संस्था हे सर्व कांड करते, ते लवकरच समोर येईल. असा ठाम दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी केला आहे तसेच टॉयलेट एक लव्ह स्टोरी म्हणत ट्विटही केले आहे.परिणामी आयएनएस विक्रांत ( INS Vikrant) नंतर आता हे नवीन प्रकरण बाहेर येणार असल्याने सोमय्यांची अडचण वाढते कि, त्यातून ते सहीसलामत बाहेर पडतात आणि भाजप कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut’s allegations : ‘आयएनएस विक्रांत’नंतर आता सोमय्यांची ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी लोकांकडून जमा करण्यात आलेल्या 58 कोटी रुपयांच्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सोमय्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता संजय राऊत सोमय्यांना अडकवण्यासाठी त्यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याच त्यांनी आज आपल्या घरी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
राऊत म्हणाले की, सध्या न्याय देवतेचे निकाल जरी बघितले तरी तुमच्या लक्षात येईल आपली न्यायव्यवस्था कुठल्या दिशेने चाललीय . न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे पण त्या पट्टीला आता कुठेतरी एक छिद्र पडलेय आणि त्या छिद्रातून एकाच बाजूचे, एका विचारसरणीचे लोक या न्याय देवतेला दिसतात. सत्र न्यायालयाने सरळ सरळ ठपका ठेवलेला असताना उच्च न्यायालय मात्र संरक्षण देते. त्यामुळे आता न्यायव्यवस्थेवरुन देखील सामान्य नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे.असेही राऊत म्हणाले.