नवी दिल्ली।स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’( ‘Savarkar Gaurav Yatra’) काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यावर ती ‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर ती ‘अदानी बचाव यात्रा'(‘Adani Rescue Yatra’), ‘खुर्ची बचाव यात्रा’ आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी टीका केली आहे.परिणामी आगामी काळात पुन्हा ” हिंदुत्वाचा अजेंडा ” (Hindutva agenda)दोन्ही बाजुंनी गाजण्याची चिन्हे आहेत.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाजपचा काहीही संबंध नव्हता. आरएसएसने तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाळीत टाकले होते. सावरकरांचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नव्हते. त्यांचे हिंदुत्व विज्ञाननिष्ठ होते. आता भाजप सावरकरांवरुन राजकीय ढोंग करत आहे. भाजप काढत असलेली यात्रा सावरकर गौरव यात्रा नव्हे ,तर अदानी बचाव यात्रा आहे. खुर्ची बचाव यात्रा आहे. अदानींच्या लुटमारीपासून लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजपने ही यात्रा काढली आहे.अशा शब्दात टीकेची तोफ डागताना भाजपचा समाचार घेतला आहे.
तेंव्हा गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही का?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज अथवा इतर थोर व्यक्तींविषयी त्यांनी केलेले वक्तव्ये सकृतदर्शनी कायद्याच्या कक्षेत गुन्हा ठरत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले, भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा भाजपला छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही का? भगतसिंह कोश्यारींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, तेव्हा भाजपला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासाठी गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही का? छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तुमचा स्वाभिमान नव्हता का? महाराष्ट्रातील जनता हे ढोंग पाहत आहे.
संपूर्ण शिंदे गट हा गद्दार,तो काय सावरकर गौरव यात्रा काढणार
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा केली. तेव्हा मुख्यमंत्री स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत दोन वाक्य उत्स्फूर्तपणे बोलू शकत नव्हते. एक कागद समोर होता, तोच एकनाथ शिंदे वाचून दाखवत होते. एकनाथ शिंदे यांना सावरकरांविषयी काही माहिती तरी आहे का? सावरकरांच्या दोन क्रांतीकारक बंधूंचे नाव तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतात का? संपूर्ण शिंदे गट हा गद्दार आहे. तो काय सावरकर गौरव यात्रा काढणार.
आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय
संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारक होते. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. गद्दारांनी आम्हाला वीर सावरकर समजावण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे स्मारक उभारण्यात बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्वीकारले आहे. आमचे हिंदूत्व विज्ञानवादी आहे. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय. भारतीय जनता पक्ष म्हणजे सावरकर नाहीत. त्यांनी यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे.असेही ते म्हणाले.