मुंबई।एकनाथ शिंदे – देवेन्द्र फडणवीस सरकार (Eknath Shinde – Devendra Fadnavis government) स्थापन होऊन एक महिना होत आला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत (Shiv Sena) विविध नियुक्त्या करत आहेत. वरिष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. यासर्व विषयांवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडताना ‘तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि नियुक्त्या करा’ असे खडे बोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून सुनावले आहेत.
संजय राऊत म्हणाले की,लीलाधर डाके, मनोहर जोशी अनेक कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके व जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल. ती आपली परंपरा आहे. असे संजय राऊत म्हणाले.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) त्यांच्या पक्षात अनेक नियुक्त्या करत आहेत. वेगवेगळी पद कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिली जात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त करत आहेत. त्यांना काय अधिकार आहे? हा सर्व पोरखेळ चालू आहे. आम्ही याला गांभीर्याने घेत नाही. यांचा संबंध काय? बाळासाहेबांनी वाढवलेल्या वृक्षात मोठे झाले, सावली घेतली, फळ खाल्ली. तुम्ही बाजूला झालेले आहात. तर तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि नियुक्त्या करा? राज्यात सत्तांतर होणारच? राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे.
आम्हाला महाराष्ट्र सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे. ती वेळ लवकरच येईल असेही संजय राऊत म्हणाले.