कोल्हापूर।
माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, या सरकारवर ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत त्यांनी अनेकवेळा तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेट्टी मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार का हेच पाहावे लागणार आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा शेट्टी यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे आता शेट्टी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.येत्या ५ एप्रिलला कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या अडीच वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी सरकारकडून निराशाच हाताला लागली आहे. त्यामुळेच ते आता महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. येत्या 5 एप्रिल रोजी शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकाराने शेतकऱ्यांविषयी घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत 5 एप्रिलला बैठकीत चर्चा करणार आहोत. शिवाय यापूर्वी जेव्हा जेव्हा सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत होते. तेव्हा तेव्हा त्याची सरकारला जाणीव करुन दिली आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.