मुंबई । मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा ५ जूनचा अयोध्यातील दौरा राजकीय वर्तुळात कोणत्या पक्षाचे आगामी मतांचे समीकरण बिघडवू शकतो यावरून राज्यात तर्कवितर्क सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याला (Raj Thackeray’s visit to Ayodhya) भाजप (BJP) खासदार बृजभूषण सिंग हे मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. त्यामुळे अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनावरून राज ठाकरे यांना कोंडीत पकडण्याची राजकीय खेळी सुरु झाल्याची चर्चा होत असताना, आता उत्तर प्रदेशमध्येच राज ठाकरे जिंदाबादचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील भाजपचे अयोध्या मतदारसंघाचे खासदार लल्लू सिंग यांनी देखील राज यांच्या दौऱ्याचे समर्थन केले होते आणि आता राज यांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशची महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड पुढे सरसावली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे कैसरगंज मतदारसंघाचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत राज्यभर सभा घ्यायला सुरुवात केली आहे आणि उत्तर प्रदेशच्या लोकांची राज ठाकरेंनी माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे. २००८ मध्ये उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या लोकांच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यावेळी त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली होती. गरोदर स्त्रियांचाही विचार त्यावेळी करण्यात आला नाही. अशा सगळ्या कारणांमुळे आधी उत्तर प्रदेशच्या लोकांची राज ठाकरेंनी माफी मागावी अशी भूमिका बृजभूषण यांनी लावून धरली आहे. एकीकडे बृजभूषण यांचे हे आव्हान असताना, आता राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशची राणी पद्मावती युथ ब्रिगेड (Rani Padmavati Youth Brigade of Uttar Pradesh has come forward in support of Raj Thackeray) पुढे सरसावली आहे. या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमध्ये जागोजागी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत. या पोस्टर्सवर लिहण्यात आले आहे की, ‘स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि युवकांचे आदर्श राज ठाकरे अयोध्येला रामाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांसह जाणार आहोत, आपण देखील या!’ असा उल्लेख करत चलो लखनऊचे (Lucknow) पोस्टर लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर या पोस्टर्सवरील भागात ‘राज ठाकरे जिंदाबाद’ असे देखील लिहिण्यात आले आहे.