भोपाळ|
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर सडकून टीका करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आता भाजपच्या नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.
सोयीप्रमाणे टोपी आणि टिळा लावणारे राहुल गांधी हे इच्छाधारी हिंदू आहेत आणि ते धार्मिक पर्यटनाकरिता जाऊन बोलतात अशी टीका मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी हिंदु देवी देवतांचा अपमान केला आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक सलोखा बिघडत असल्याचे आमदार शर्मा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राहुल गांधी यांची टीका… भाजप आणि आरएसएसच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेताना राहुल गांधी यांनी भाजपकडून फायद्यासाठीच धर्माचा वापर केला जात असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, भाजपला हिंदुत्वाची काळजी नाही, ते केवळ स्वार्थासाठी धर्माचा वापर करत आहेत. हे खोटे हिंदू आहेत. हिंदू धर्माचा प्रयोग करत आहेत. ते हिंदू नाहीत तर धर्माची दलाली करतात. एकीकडे स्वतःला हिंदू पक्ष म्हणवून घेतात दुसरीकडे लक्ष्मी व दुर्गा यांच्यावर हल्ले करतात. देवतांना संपवितात. त्यानंतर ते हिंदू असल्याचे सांगतात. हे कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? महिला सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणजे लक्ष्मी आणि दुर्गा आहेत. मात्र हे भाजप सरकार नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि महागाईने हे महिला सशक्तीकरण संपवित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.