नवी दिल्ली ।काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)गुरुवारी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की ‘मी लंडनमध्ये भारताविरुद्ध काहीही बोललो नाही. मला संसदेत ( Parliament) बोलण्याची संधी मिळाली तर मी माझे म्हणणे मांडेन’.मात्र भाजपला (BJP) माझे बोलणे आवडत नाही.असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेचे कामकाज सुरू होताच दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा गदारोळ झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
याअगोदर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले होते की, जर राहुल गांधी काही बोलले आणि त्यांच्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या तर आम्ही या प्रकरणात काहीही करू शकत नाही. पण जर त्यांनी देशाचा अपमान केला तर भारतीय म्हणून आपण गप्प बसू शकत नाही. राहुल गांधी यांनी याप्रकरणी माफी मागावी, असे ते म्हणाले.त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, याआधी अनेक वेळा पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन देश विरोधात बोलले. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असा प्रश्नच उद्भवत नाही.तर दिग्विजय सिंह म्हणाले की, राहुल गांधी लंडनमध्ये काय बोलले, जे त्यांनी भारतात सांगितले नाही. आधीच्या सरकारांबद्दल स्वत: पंतप्रधान म्हणाले की, त्यांना भारतात जन्म घेण्याची लाज वाटायची. हा देशाचा अपमान म्हणून पाहणार नाही का? हे सर्व मुद्दे अदानी प्रकरणात संसदीय समितीच्या स्थापनेबाबत चर्चा टाळण्याशिवाय दुसरे काही नाहीत.(Rahul Gandhi: BJP does not like my speech!)
‘त्याची’ भाजपला भीती
पवन खेरा म्हणाले की, काँग्रेस जेव्हा जेव्हा अदानी मुद्द्यावर संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करते तेव्हा भाजप लक्ष वळवण्यासाठी अधिवेशन तहकूब करतो. अदानी यांच्या नावाचा कोणी सभागृहात उल्लेख करेल, अशी भीती भाजपला आहे.