पुणे । पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Elections 2024) इंडिया आघाडीने(India Aghadi) कंबर कसली आहे.येत्या 24 तारखेला मेळावाही होणार आहे.मात्र लोकसभेसाठी एकीची मोट बांधणाऱ्या इंडिया आघाडीत मात्र काँग्रेस मधील स्थानिक पातळीवरील गटा तटाचे मनोमिलन होणार का ? हा पेच कायम आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील (India Aghadi) वरिष्ठ कोणती भूमिका घेतात आणि पुण्याच्या या महत्वाच्या जागेबाबत कोणती ‘तजवीज’ करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
‘ मी ‘ पणामुळे काँग्रेसने वर्चस्व गमावले
विविध पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha Elections 2024) तयारी सुरू केली आहे.त्यामुळे पुण्यात इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असेल? हा प्रश्न महत्वाचा ठरला आहे. तसेच कोण उमेदवार यावरून चाचपणीही सुरू झाली आहे.
काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटांच्या (Congress Nationalist Congress Sharad Chandra Pawar Party and Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) विधानसभा मतदारसंघ निहाय या बैठका होणार असल्या तरी कार्यकर्त्यांची मोट बांधली तरच इंडिया आघाडीचा उद्देश मतदारांपर्यंत पोहचणे शक्य आहे.त्यामुळे प्रारंभी स्थानिक पातळीवरील गट तट विसरून जर एकत्र आले तर महायुतीच्या उमेदवाराचे मतांचे समीकरण बिघडू शकते.याकडे काँगेसच्या नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.नाहीतर मी म्हणजे पक्ष हेच महागात पडेल.सद्यस्थितीत ‘ मी ‘ पणामुळे काँग्रेसने वर्चस्व गमावले आणि आता अस्तित्वाच्या लढाई पर्यंत पोहोचले आहे तरी गटबाजी काही संपता संपेना.अशी स्थिती कायम आहे.
काँग्रेससह ‘साहेबां’च्या पक्षाला पोषक स्थिती … अदला बदल पथ्यावर
मागील निवडणुकांमधील काँग्रेसला पडलेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसला मिळालेली आहेत.तसेच काही मतदार संघात साहेबांच्या राष्ट्रवादीला पोषक स्थिती आहे.मात्र दादांच्या राष्ट्रवादीला शह द्यायचा असेल तर लोकसभा निवडणुकीतील मतांचे फाटाफूट करणे हेच लक्ष्य महत्वाचे ठरणार आहे.तरच विधानसभा निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करता येईल.नाहीतरी आज दोन आमदार पूर्वाश्रमीच्या साहेबांच्या आणि आज दादांच्या राष्ट्रवादीचे आहेत पण ते जेमतेम फरकाने निवडून आलेले आहेत.त्यामुळे आपसूक भाजपचे लक्ष्य पुन्हा मतदारसंघ काबीज करणे असले तरी याचा फायदा इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.त्यासाठी मतदारसंघांची अदला बदल केली आणि योग्य उमेदवार दिले तर महायुतीला धोबी पछाड देणे शक्य होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
साहेबांच्या पक्षात जुन्या जाणत्या लोकांकडे सूत्रे नको
काँग्रेसने आधी पक्षातील गटबाजी संपवावी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पूर्वीपासून असलेल्या जुन्या जाणत्या लोकांकडे सूत्रे सोपवू नयेत.कारण याच जुन्या लोकांचे अनेक समर्थक आज दादांच्या राष्ट्रवादीत स्थिरावले आहेत.त्यामुळे आज जे लढत देत आहेत.त्यांच्याकडेच सूत्रे कायम ठेवणे गरजेचे आहे.अन्यथा राजीनामा सत्र सुरू होईल आणि शेवटी ‘ पानिपत ‘ होईल. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्वीचे दिवस आणणे सद्यस्थितीत कठीण असले तरी जे बालेकिल्ले पूर्वी होते.तिथे लक्ष दिले तर बदलत्या राजकारणात लॉटरी लागेल.त्यामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेसची भूमिका ही मी पणाची नसेल तर सगळं काही ठीक होईल. पण गटबाजी मध्ये अन्य सहकारी पक्षाचे नुकसान होईल.त्यामुळे आधी गटबाजी संपवणे हेच ध्येय काँग्रेसचे असले पाहिजे.
1991,1999 आणि 2014 चा अपवाद वगळता या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ राज्य केले आहे.एस.एम. जोशी,मोहन धारिया यासारख्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी 2004 आणि 2009 साली सलग विजय मिळवला होता. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे 2014 ला काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले आणि डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. पण भाजपच्या अनिल शिरोळे यांनी 2014 ला मोठ्या फरकाने या मतदारसंघात विजय मिळवला. पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून त्यांनी तीन लाख 24 हजार 628 इतके मताधिक्य मिळवले होते.वास्तविक २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुणे शहरातील सर्व मतदारसंघात भाजपने वर्चस्व स्थापित केल्याचा लाभ त्यांना सर्व निवडणुकांमध्ये झाला, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना गृहित धरण्याचा फटका काही विधानसभा मतदारसंघात भाजपला बसला.सद्यस्थितीत बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर नेमकी हीच बाब इंडिया आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र त्यासाठी काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात येणे आवश्यक आहे.
Pune Lok Sabha Elections 2024: India Aghadi to face factionalism in Congress