Pune Lok Sabha Constituency BJP VOTE

Pune Lok Sabha Constituency: मतांचा टक्का, भाजपला यंदा धक्का?

पुणे ( प्रवीण पगारे ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने(BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. आता पुढच्या यादीत महाराष्ट्राचा मुहूर्त लागतो का की  शेवटी यादी जाहीर केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   त्यातही पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळते यानुसार राजकीय व्यूहरचना आखल्या जातील.मात्र   राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटाकडून कोणत्या अपेक्षा आहेत, या प्रश्नापेक्षा राज्यातील या सत्ता स्थापनेच्या विचित्र  प्रयोगामुळे जनमानसात संमिश्र पण संतप्त  प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे मतांची विभागणी कुणाच्या पथ्यावर पडते  ही बाब जितकी महत्वाची आहे,त्याहीपेक्षा भाजपला त्याचा सर्वाधिक  फटका बसतो का हा मुद्दा महत्वाचा आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी आणि पुणे कॅंटोन्मेंट हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या मतांचे समीकरण बिघडवू शकतो . परिणामी मताधिक्य घटण्यास हे दोन मतदारसंघ कारणीभूत ठरतील तसेच सद्यस्थितीतील राजकीय उलथापालथ पाहता हा मतदारसंघ गमावण्याची वेळही ओढवू शकते. 
 
पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Constituency) यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू  शकते याचा आढावा घेतला तर यंदा भाजपच्या(BJP)मतांमध्ये घसरणीची ‘टांगती तलवार’ आहे. वंचितचा सहभाग जर महाविकास आघाडीत झाला तर वडगावशेरी , पुणे कॅंटोन्मेंट या दोन विधानसभा   मतदारसंघात त्याचा सर्वाधिक फटका भाजपला (BJP) बसू शकतो. त्यात मराठा आरक्षणामुळे आक्रमक असलेल्या मराठा समाजाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते. 
गत लोकसभा निवडणुकीत  वडगावशेरी  मतदारसंघातून  महायुतीला म्हणजेच भाजपचे उमेदवार दिवंगत खासदार गिरीश बापट यांना १,१७,६६४ तर महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना  ६०,८४३ मते मिळाली.तर वंचितने  २१,०८४ मते घेतली. त्यावेळी २,०८९ नोटा तर इतर ४,४८९ असे एकूण २ लाख ६ हजार १६९ मते वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून महायुती व आघाडीसह अन्य उमेदवारांना मिळाली.त्यामुळे यंदा या मतदारसंघातून लोकसभेला किती मतदान होते हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
 गत लोकसभा निवडणुकीत वडगावशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट त्यापाठोपाठ शिवाजीनगर, पर्वती या विधानसभा मतदारसंघात ‘वंचित’ ला मिळालेली मते आणि आघाडीला मिळालेली मते पाहता वडगावशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट हे दोन मतदारसंघ भाजप पर्यायाने महायुतीला धोकादायक ठरणार आहे. या दोन मतदारसंघात वंचित आणि आघाडीचे मते यांची बेरीज केली तर  भाजपला मिळालेल्या मतांचा फरक हा जेमतेम आहे. पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान पाहता, महायुती पर्यायाने भाजपला ६७,१७७ तर महा आघाडीला ५४,४४४ मते आणि वंचितला १४,६९९ व अन्य असे एकूण १,४०,३६४ मतदान झाले. त्यात जर महा आघाडीचे  ५४,४४४  आणि वंचितच्या  १४,६९९  या मतांची बेरीज केली तर ६९,१४३ अशी होते. त्यामुळे यंदा जर वंचितचा सहभाग महाविकास आघाडीत झाला तर इथे सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यात आंबेडकरी चळवळीचे तसेच मुस्लिम समाजाचे मतदान महाविकास आघाडीसाठी  जमेचे  ठरू शकते. शिवाजीनगरमतदारसंघात भाजपला ७७,९८२ तर काँग्रेसला ४८,४५० अशी मते मिळाली तर वंचितने ११,३७६ मते घेतली. पर्वती मतदारसंघात १०,६३४ मते वंचित आघाडीला मिळाली.   आता राजकीय स्थिती बदलेली आहे आणि त्यावरून मतदारांच्या भावना संतप्त आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजभावना या महायुती सरकारविरोधात आहेत . तसेच मूळचे भाजपेयी , संघनिष्ठ वर्गाला राज्यातील भाजपच्या या सत्तेचा विचित्र प्रयोग पचनी पडलेला नाही.  त्यामुळे  भाजपला यंदा लोकसभेला मतांची टक्केवारी घसरणीला सामोरे जावे लागू शकते. किंबहुना महाविकास आघाडीच्या मतदारसंघ अदला -बदलीच्या व्यूहरचनेत पुण्याची लोकसभेची (Pune Lok Sabha Constituency) जागा  भाजपला गमावण्याची वेळ ओढवू शकते. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग झाल्यास आंबेडकरी चळवळ आणि मुस्लीम समाजाच्या  एक गठ्ठा मतांपासून भाजप यंदा ‘वंचित’ व्हावे लागेल अशी स्थिती आहे. 
Pune Lok Sabha Constituency: Percentage of votes, a blow to BJP this year

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *