aba bagul

Pune Lok Sabha Aba Bagul:पुण्यासाठी काय केले? भाजपपुढे पेच!

पुणे| लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha) अखेर भाजपने (BJP)माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन मराठा कार्ड वापरले असले तरी काँग्रेसमधून  माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडीकडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता आबा बागुल (Aba Bagul) हेच यासाठी पात्र ठरत आहेत. येत्या १८ मार्चला हे नाव अंतिम केले जाईल. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  परिणामी यंदाची लोकसभा (Pune Lok Sabha) भाजपसाठी (BJP)प्रतिष्ठेची असली तरी  मतांचे समीकरण जुळविण्यासह पुण्यासाठी ठोस काय केले ?  हाच मोठा पेच आतापासूनच  निर्माण झाला आहे. 
 
केवळ मेट्रो,  नदीसुधार, वैदयकिय महाविद्यालय, चांदणी चौक उड्डाणपूल आणि विमानतळ विस्तारीकरण ही कामे पुढे रेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मत मागणे हेच पुणे लोकसभा मतदारसंघ गमाविण्याचे कारण बनू शकते. ही’टांगती तलवार’  असली तरी भाजपकडून ज्यावेळी जाहीरनामा सादर होईल त्यातही पाच वर्षात पुण्यासाठी काय  केले? यावरून अपयशाची कबुली  अप्रत्यक्ष देण्याची वेळही ओढवणार असल्याचे वास्तव आजमितीस आहे. त्यामुळे मोदींच्या नावाने मत मागणे भाजपला महागात पडणार आणि पाच वर्षात जे जे प्रकल्प राबविले,त्याचे विरोधकांकडून होणारे ‘पोस्टमार्टेम’ या कात्रीत भाजपच्या उमेदवाराला अडकावे लागणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे ठाम मत आहे. 
 
मागील लोकसभा निवडणुकीतील  ६ विधानसभा निहाय मते पाहिल्यास  पाहिल्यास  भाजपला पर्यायाने  दिवंगत खासदार गिरीश बापट यांना ,त्यांच्या सर्वपक्षीयांशी असलेल्या संबंधामुळे ६ लाख ३२ हजार ८३५ मते मिळाली. मताधिक्य हे ३लाख २४ हजार ६२८ होते. मात्र सर्वपक्षीयांशी उत्तम संबंधामुळे स्व. गिरीश बापट यांना जे   ३लाख २४ हजार ६२८ मताधिक्य मिळाले ते यंदा भाजपला मिळणार नाही. त्यामुळे या मतांची विभागणी अटळ आहे आणि ती काँग्रेसला जमेची ठरू शकतात. माजी खासदार अनिल शिरोळे यांना मिळालेली मते पाहूनच जरी भाजपने यंदा पुन्हा मराठा उमेदवार दिला असला तरी तेंव्हाची आणि आताच्या परिस्थितीत आज बदल झालेला आहे.
सद्यस्थितीत  मराठा आरक्षण प्रश्नावरून  विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर मराठा समाजाचा  रोष मोठा आहे. मात्र खरा राग हा भाजपवर आहे. त्यातही सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या भाजपच्या पवित्र्यामुळे मतदारच काय भाजपचे एकनिष्ठ, आरएसएसचे कट्टर समर्थकही संतप्त आहेत. त्यामुळे मतांचे समीकरण जुळविताना मोठी कसरत भाजपला पर्यायाने उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना करावी लागणार असली तरी मतांच्या विभाजनाला त्यांना सामोरे जावे लागणारच आहे. 
मागील काही निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यास काँग्रेसला हक्काची ३ लाख मते आहेत ही जमेची बाब काँग्रेससाठी  आहे.माजी खासदार सुरेश कलमाडी पासून काँग्रेसला ३ लाखपंर्यंत मते हक्काची मिळत आलेली आहे. आता राजकीय स्थिती बदलली आहे. लोकांमध्ये विद्यमान केंद्र व राज्य  सरकारबाबत मोठी नाराजी आहे. त्याचा फायदा निश्चित  काँग्रेसला होणार आणि  मुस्लिम समाजाची मतेही  काँग्रेसला बोनस ठरणार आहेत. 
थेट फायदा   काँग्रेसला
मराठा – ओबीसी लढतीचा थेट फायदा हा काँग्रेसला होणार आहे. त्यात काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागुल हे लोकसभेच्या लढतीत असल्याने पुण्याचा  शाश्वत  विकास  हा मुद्दा यंदा गाजणार आहे.   आबा बागुल हे अनुभवी आहेत आणि आजवर विविध ठरावाच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या विकासाला हातभार लावलेला आहे. सर्वसमावेशक हे त्यांचे धोरण आहे.तसेच आदर्शवत प्रकल्पांची उभारणी त्यांनी केलेली आहे.  राजीव गांधी ई -लर्निंग  स्कुल हे देशात रोल मॉडेल ठरले आहे. माजी पंतपधान मनमोहनसिंग यांना सादरीकरण करून ही आधुनिक शाळा साकारली गेली. त्यामुळे त्यांना  जनाधारही   मोठा आहे.  त्यातुलनेत मुरलीधर मोहोळ हे समाज माध्यमांवरून लोकप्रिय आहेत. ठोस विकासकामांचा अभाव आहे.  ज्यावेळी प्रत्यक्ष मतदारांसमोर जाताना ‘आपलेपणा’ हा काँग्रेसच्या उमेदवारासाठी जमेची बाजू आहे. सद्यस्थितीत पुण्यात वाहतूक प्रश्न, कचरा, रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहतूक सेवा असलेली पीएमपी अजूनही सक्षम नाही. मेट्रो केली तरी लोकसंख्येच्या घनतेनुसार क्षमता निर्माण होण्यास मोठा अवधी लागणार आहे. असे अनेक प्रश्नांना पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी पाच वर्षे महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही भाजपने पुण्यासाठी काय केले हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.  यंदाही ब्राम्हण समाजाची नाराजी राहणारच आहे.  त्यामुळे कोणत्याही पक्षातून  ( आप ) ब्राम्हण उमेदवार निवडणुकीत उभा राहिल्यास मतविभागणीचा फटका भाजपला बसणार आहे. वंचितचे  मते यंदा प्रभावी ठरणार असून  भाजपला  मारक ठरणार आहे.  विकासकामांवरून भाजपला टीकेला सामोरे जावे लागणार आहे पण  ठराविक बांधकाम व्यावसायिक ,ठेकेदार यांच्या  फायद्यासाठी  कामे झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे   भाजप नक्की पुणेकरांच्या हितासाठी की भांडवलदारांसाठी हा मुद्दाही प्रचाराच्या रणधुमाळीत तापवला जाईल. त्यामुळे या पेचातून भाजपला अंग काढून घेणे यंदा अवघड आहे.  
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *