लखनौ । लाऊड स्पीकरवरून (loudspeakers) ना अजान ना हनुमान चालिसा,तर महागाईबाबत ‘महागाई डायन खाये जात है’ अशी गाणी लावली जात असल्याने देशात वाराणसी चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये भोंग्यावरून महागाईविरोधात (inflation is being expressed through loud speakers in the Lok Sabha constituency) गाणी वाजवून महागाई विरोधात जनतेमधील रोष लाऊड स्पीकरच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
अजानसाठी’भोंग्यावरून वरून महाराष्ट्रासह देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.प्रत्युत्तरादाखल हनुमान चालिसा लाऊड स्पिकरवरून लावण्याचा इशारा महाराष्ट्रात मनसेने दिला आहे. परिणामी राजकीय वातावरणात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेले लाऊड स्पीकर वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. कारण, या लाऊड स्पीकरवर अजान किंवा हनुमान चालीसा वाजविली जात नाही. तर देशात वाढत चाललेल्या महागाईबाबत ‘महागाई डायन खाये जात है’ अशी गाणी लावली जातात, हे विशेष. याचीच व्याप्ती देशभरात व्हावी आणि महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारला भाग पाडावे अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.
लाऊड स्पीकरवर महागाईचे सूर काढणारे हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत. समाजवादी पक्षाचे नेते रवी विश्वकर्मा म्हणतात की, लाऊड स्पीकरवरून (loudspeakers) देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे लाऊड स्पीकरवरून ‘महागाई डायन’ हे गाणे वाजवून वाढत्या महागाईकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट करून लिहिले आहे की, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीविरोधात आवाज उठवणारा हा पहिला लाऊड स्पीकर आहे. व्हिडिओमध्ये सपा नेते रवी विश्वकर्मा म्हणाले, की आज देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. लाऊडस्पीकरवर आरती आणि अजान हा महत्त्वाचा प्रश्न नाही. लाऊड स्पीकरच्या नावाखाली काही लोक या मुद्द्यावरून भरकटिवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही समाजवादी आहोत. सत्ताधारी पक्षाला मुख्य मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करू. माझ्या घराच्या छतावर हा लाऊड स्पीकर लावून मी माझ्या नातेवाईकांना व जनतेला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.