नवी दिल्ली| मोदी सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करून लोकशाहीसंदर्भात राहुल गांधी यांनी ‘मोदीजी संकेत समजून घ्या ‘अशी कॅप्शनही दिली आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि जगभरातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. हॅरिस यांचे वक्तव्य पाहता, जे लोकशाहीला हुकूमशाहीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यांना हे ऐकून आवडले नसेल, मोदीजी संकेत समजून घ्या अशी कॅप्शन राहुल गांधी यांनी पोस्टला दिली आहे.
पंतप्रधान मोदी व अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हॅरिस यांनी जगभरातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने साथ देण्याची गरज आहे. अमेरिका आणि भारत एकत्रित मिळून लढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भारताने अमेरिकेला त्यासाठी साथ द्यावी असे आवाहनही केले.