Politics of Maharashtra: If Ajit Pawar becomes the Chief Minister, who will be the Deputy Chief Minister?

Politics of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण ?

  महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आधी शिवसेनेचे (Shiv Sena)दोन उभे गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत ( NCP)उभी फूट पडली आहे. मात्र राष्ट्रवादीतील या फुटीमागे नेमके कोण हे सर्वश्रुत असले तरी आगामी लोकसभा(upcoming Lok Sabha) त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत जागांचे गणित जुळवायचे हे  लक्ष्य भाजपचे(BJP) जसे आहे,तसे राष्ट्रवादीलाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी राज्यात ‘सीएम ‘ पदाद्वारे राज्यावर पकड मिळवताना  भाजपबरोबर सत्ता भोगण्याचा ‘पॅटर्न’ हा ठरवून असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात जसा महत्वाचा ठरणार आहे,तसा भाजपच्या अंतर्गत गोटात नव्या गटाला शह देण्यासाठी जमेचा कसा ठरेल यानुसार ‘एका दगडात’च्या धर्तीवर डाव रंगत आहे.(Maharashtra politics)   
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘सीएम’ पद आजमितीस शाबूत असले तरी मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचे मनसुबे नुकतेच राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवून भाजपच्या आधाराने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार यांची  निश्चितच आहे.त्यात  मुख्यमंत्री व्हायचे ही मनिषा त्यांनी यापूर्वीही बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे ‘मी पुन्हा येईन’ हा नारा देणाऱ्या दुसरे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचीही सत्तेच्या सारीपाटात फसगत झाली आहे. कोणत्याही स्थितीत सत्तेत राहायचे हा डाव यामागे असला तरी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून हे ‘बेरजेचे समीकरण’ सुरु आहे.मात्र त्यात भाजपची  प्रतिमाच मलिन होत आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यात कोणतेही बदल होऊ द्यायचे नाही हे भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाचे धोरण आहे. लोकसभा निवडणुकीत लक्ष्य गाठले तर ठीक ;अन्यथा विधानसभा लांबणीवर टाकण्याचा प्लॅन तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.    
 
मुख्यमंत्रीपदावरून काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले  होते. ‘मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचे  काम दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा आहे, असे  विधान नाना पटोलेंनी केले होते. त्याला आक्षेप घेताना अजित पवार यांनी आम्ही बेअक्कल आहोत का ? असा थेट सवाल करत आरोप फेटाळले होते. आता  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा आरोप फेटाळताना आज एक मजबूत सरकार आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे , असे  काही जण सांगतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे. पण, त्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आमची नजर आहे. असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही असे यापूर्वी  म्हणणाऱ्या  फडणवीस यांची पुढची राजकीय महत्वाकांक्षा काय हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
 
त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ‘ वेगळी चूल’ मांडणाऱ्या  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात  गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा तर्क वितर्क सुरु झाले नाही तोच आता एकमेकांविरोधात दंड थोपटून विचारांची लढाईचा पट मांडला गेला आहे. परिणामी राष्ट्रवादीतील या दोन गटाची लढाई नेमकी कुणाविरोधात आहे हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहे. 
  त्यात   नेमकी बैठक कशासाठी या प्रश्नापेक्षा राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार का हाच मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यातही अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असेल तर उपमुख्यमंत्री कोण या प्रश्नाकडेही राजकीय वर्तुळातून लक्ष वेधले जात आहे.
सद्यस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ‘अलिप्त’वादाची भूमिका घेत आहेत  तसेच मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही काळ कळ काढण्यासाठी भाजपला मनधरणी करावी लागत आहे.मात्र आमदार अपात्रतेच्या धास्तीने शिंदे गटात अस्वस्थता पसरलेली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही बदल करू  नये हे साकडे आधीच दिल्लीत घातलेले  आहे आणि अनुकुलताही त्यांना लाभल्याचे बोलले जात आहे.   त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना ‘आम्ही आहे त्याच पदावर ठीक आहोत’ही भूमिका जाहीर करावी लागली पण  येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांचे  म्हणणे आहे. मुख्यमंत्री पदावर अजित पवारांची वर्णी लावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांची ठरवून कोंडी करण्याचा घाट घातला जाणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करताना भाजपमधील आक्रमक नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर  उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपविण्याची रणनीती भाजपच्या दिग्गजांची आहे. तर उपमुख्यमंत्री  देवेन्द्र  फडणवीस यांना केंद्रातील अर्थ खाते खुणावत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीत जागांचे गणित जुळवून पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हस्तगत करायचा आहे. त्यात प्रादेशिक पक्ष मुक्त राज्ये हा अजेंडा राबवून २०२४च्या लोकसभेत घवघवीत यश मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.    शिवसेना फोडल्यानंतर दोन गटांच्या लढाईत एकमेकांना गुंतवून त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातील मतांचे समीकरण बदलण्याचे डावपेच भाजपचे असले तरी त्यात लाभार्थी कसे होता येईल यानुसार राष्ट्रवादीची रणनीती आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात सीएम पदाचे लाभार्थी कोण होतात की लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘तजवीज’ करून वेळ काढण्याचे तंत्र अवलंबले जाते हे नंतर स्पष्ट होणार आहे. तूर्तास भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या या  बेरजेच्या समीकरणाला  जनता कितपत थारा देईल हाच मुद्दा आगामी काळात महत्वाचा ठरणार आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार  प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला  दिलेल्या पण काँग्रेसने फेटाळलेला  रोड मॅप नुसार  राष्ट्रवादीने आखलेल्या व्यूहरचनेत कोण फसणार   की राष्ट्रवादीच स्वतः गारद होणार हेही नंतर स्पष्ट होणार आहे. Politics of Maharashtra: If Ajit Pawar becomes the Chief Minister, who will be the Deputy Chief Minister? 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *