सोलापूर। ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून सत्तेचा होणारा दुरुपयोग सर्व जनतेला आता दिसत आहे. मला ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती; मात्र जनतेने त्यांना वेडे ठरवले.अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला;मात्र हे मोदी सरकार या सर्व गोष्टी व्यापार्यांच्या हातात देत आहे.
शेतकरी कायदा विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या संशयित आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या ऑफिस व घरी आयकर विभागाने छापेमारी केली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सरकारी पाहुण्यांचे आम्हाला कधीच चिंता नाही तसेच माझा काही संबंध नसलेल्या बँकेशी मला जोडून ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर काय झाले, जनतेनेच भाजपला वेडे ठरवले.