पुणे|
आगामी महापालिका निवडणुकीत ( forthcoming municipal elections in Pune) पुण्यात कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढू नये यासाठी कंबर कसलेल्या भाजपकडून (BJP) आता शिवसेनेलाही नेस्तनाबूत करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.त्यामागे या दोन्ही पक्षांना भाजपमधील नाराजांचा,पक्षांतर करणाऱ्यांचा फायदा कदापी होऊ नये, यासाठी मतविभाजनाची ‘मात्रा ‘ वापरण्याची रणनीती भाजपने आखली असून त्यानुसार ‘ बेरजेचे समीकरण’ही सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी, निवडणूका कधी होईल याबाबत अजून स्पष्टता नाही. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरु झाली असली तरी प्रशासकीय कारभाराचेही संकेत आहेत. मात्र सोईस्कर अवधी मिळाल्याने सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.त्यात राष्ट्रवादीकडून सत्ताधारी भाजपवर विकासकामांवरून सातत्याने टीकेची तोफ डागली जात आहे. इतकेच नाहीतर भाजपच्या गोटातील अनेकांना गळालाही लावले आहे. त्यात पक्षांतर्गत असंतोष उफाळून येत असल्याने तसेच समाविष्ट ३४ गावांमुळे सत्तेची समीकरणे बदलत असल्याने भाजपच्या वर्तुळात त्यावर मंथन सुरु झाले आहे.त्यात इच्छुकांची वाढती संख्या पाहता, उमेदवारी वाटपात असंतोषाचा भडका उडणार हे चित्र आतापासूनच दिसत असल्याने भाजपच्या नेतृत्त्वाने आता सावध पवित्रा घेतला आहे.त्यानुसार विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात असून, जिथे पक्षाचे प्राबल्य आहे. तिथे लक्ष केंद्रीत करायचे. जिथे ताकद नाही,तिथे छुप्यारीतीने अन्य पक्ष,किंवा मनसेच्या उमेदवारांना चालवायचे यावर प्राथमिकरीत्या शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. तसेच यंदा उमेदवारी वाटपात नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची मात्र ते किती टक्के यावरही विचारविनिमय सुरु झाला आहे. त्यामागे भाजपमधील नाराजांना दिलासा कसा देता येईल,यासह राष्ट्र्वादी – शिवसेनेतील नाराजांचा उपयोग कसा आणि कुठल्या मतदारसंघात करून घेता येईल यानुसार व्यूहरचना आखण्यास प्रारंभ झाला आहे. सत्तेचा मार्ग सुकर करणाऱ्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करताना, जिथे प्राबल्य नाही त्या त्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी, शिवसेनेतील नाराजांना भाजप प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे. वेळप्रसंगी मनसे अथवा अन्य पक्षांच्या उमेदवारांना चालवून मतांचे विभाजन पथ्यावर पाडून घेण्याची रणनीती भाजपची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.गत विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजपने गमावलेले आहेत.त्यामुळे या दोन मतदारसंघात फुटीची मात्रा वापरली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करता येणे सहजशक्य आहे. त्यात या दोन मतदारसंघात यंदा नगरसेवकांची ६३ संख्या असणार आहे. हे पाहता उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही ( NCP and Shiv Sena) इच्छुकांची रस्सीखेच होणार हे अटळ आहे आणि नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळणार आहे. त्याचा अचूकतेने फायदा उचलला तर या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व प्राप्त करता येऊ शकते. प्रामुख्याने हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर आणि वडगावशेरी या विधानसभा मतदारसंघात मतविभाजनाचा डाव खेळून सेनेसह राष्ट्रवादीला गारद करण्याकडे भाजपचे प्राधान्य राहील. याठिकाणी होंणाऱ्या मतविभाजनामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होण्यास हातभार लागेल असा अंदाज भाजपमधील काही मंडळींचा आहे. त्यामागे पुन्हा एकहाती सत्ता सद्यस्थितीत अशक्य असल्याचे गृहीत धरले जात असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम ठरणाऱ्या यंदाच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रस्थ वाढू द्यायचे नाही, हा मुख्य अजेंडा आहे.