पुणे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुणीही सिरियसली घेत नाहीत,असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार मैदानात उतरले असे विधान केले होते.त्यावर प्रत्युत्तर देताना देशमुख यांनी उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का? अशा शब्दात जशास तसे उत्तर देऊन चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला निष्फळ ठरवले आहे. देशमुख म्हणाले की, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आणि भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आघाडीच्या एकजूटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणाम झालेला नाही. त्यामुळेच भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेतअसा टोलाही देशमुख यांनी लगावला आहे. आगामी निवडणुकात पुणे आणि पिंपरी महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करताना जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही,असेही देशमुख म्हणाले.