मुंबई ।राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे भिजत असले, तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे (Vidhan Parishad teachers and graduates constituencies) बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना. गो. गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची जानेवारी २०२३ अखेर निवडणूक होणार आहे.
विक्रम काळे हे औरंगाबाद, बाळाराम पाटील कोकणातून तर ना. गो. गाणार हे नागपूरमधून शिक्षक मतदार संघातून निवडून आले आहेत. पदवीधर मतदार संघातून आमदार डॉ. पाटील हे अमरावती तर डॉ. तांबे हे नाशिकमधून निवडून आले आहेत. या पाचही आमदारांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची ७ जानेवारी २०२३ रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक जाहीर केली जाणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपाच्या (BJP) पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादी – काँग्रेससाठी (NCP-CONGRESS) ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची असल्यामुळे निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.(New Electoral Roll: Teacher and graduate constituencies election bugle sounded!)