पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटी नंतर शहर कार्यालय (Nationalist Congress Party Pune City) कोणत्या गटाकडे यावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे छायाचित्र वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार अखेर हटविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्या हस्तेच या कार्यालयाचे काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते.कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये आणि शरद पवार यांच्या समवेत असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जावा यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा राजकीय डाव आहेे, अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्था आहेत. त्यामुळे पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचे छायाचित्र हटवावे का, अशी विचारणा वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीच छायाचित्रे यापुढे वापरण्यात यावीत, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यानुसार अजित पवार यांचे छायाचित्र हटविण्यात आल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर दोन गटात वाद सुरू झाले आहेत. प्रशांत जगताप यांनी शहर कार्यालयाचा करार त्यांच्या नावे असल्याने कार्यालयाचा ताबा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही दिला होता.(Nationalist Congress Party Pune City: Ajit Pawar’s photo finally ‘deported’!)