नागपूर । जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former Jammu and Kashmir Governor Satya Pal Malik) यांनी पुलवामा घटनेचे ( Pulwama incident) जे काही वर्णन केले आहे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी थेट मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केल्याने आता भाजपच्या(BJP) वर्तुळातून कोणती प्रतिक्रिया उमटते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नाना पटोले यांनी नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभास्थळाची पाहणी केली. या सभेला जवळपास लाखभर लोक गर्दी करतील, असा दावा यावेळी त्यांनी केला.
‘द वायर’साठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील सरकार जबाबदार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती, पण संरक्षण मंत्रालयाने ती नाकारली. त्यासाठी ‘फक्त 5 विमानांची गरज होती. गृहमंत्रालयाकडून विमान मागितले, पण त्यांनी विमान देण्यास नकार दिला. पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच संध्याकाळी पंतप्रधानांना ही आपली चूक असल्याचे सांगितले. मात्र,त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना गप्प राहण्यास सांगितल्याचे मलिक म्हणाले. या मुलाखतीमुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे.
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे काही वर्णन पुलवामाच्या घटनेचे केले आहे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. देशाच्या सुरक्षेत आपल्याच सैन्याचा मृत्यू त्या ठिकाणी घडवण्याचे हे कृत्य आहे. देशाच्या जनतेत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधानांनी याबाबत उत्तर द्यावे, हे उत्तर घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
भाजपला ‘वज्रमूठ’ची धास्ती!
नाना पटोले म्हणाले की, नागपुरातल्या सभेसाठी जागा कमी आहे, लोकांचा विरोध आहे, अशा अफवा पसरवल्या. मात्र, या सभेला भाजपचा विरोध असल्याचे दिसते. जवळपास पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथे करण्यात येत आहे. बाजूच्या जागा आहेत. एक लाखाच्या वर याठिकाणी लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सगळी भीती लक्षात घेता भाजपने रणनीती थेट कोर्टापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मनामध्ये असलेली या धास्तीतून ते या सभेला विरोध करत होते. या सभेत एका पक्षातून दोन लोक बोलणार असल्याचे ते म्हणाले.