पुणे । कसबा विधानसभा (Kasba Assembly) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असून निवडणूक लढविण्यासाठी दहा अर्ज आले आहेत. त्या अर्जांची चाचपणी सुरू असून, ३ फेब्रुवारीपर्यत उमेदवाराचे नाव निश्चित आणि जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी येथे सांगितले.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका भाजप विरोधकांनी घेतली आहे.त्यामुळे काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढविण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वास्तविक हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा होता,मात्र त्यावर राष्ट्रवादीकडूनही ‘कब्जा’ मिळविण्याचे लक्ष्य आहे. त्यात शिवसेनेनेही पोटनिवडणुकीसाठी तयारी चालवली आहे. तर भाजपच्या गोटात आगामी लोकसभेसाठी काहींचे मनसुबे आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंतर्गत राजकारण पेटले असून पूर्वीचा एक गट पुन्हा एकवटला आहे.
काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंदे शिंदे आणि सहयोगी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचाच होता. कसबा मतदार संघ काँग्रेस पुन्हा मिळविणार आहे. पोट निवडणुकीसाठी दहा अर्ज आले आहेत. त्याची चाचपणी सुरू आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.(Nana Patole: February 3 ‘decided’ for Kasba Assembly by-elections)