नागपूर। बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना ( Satyajit Tambe) पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसचा (Congress) पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाचा अहवाल हायकमांडला पाठवला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान थोरात आणि तांबे कुटुंबात अंतर्गत कलह आहेत. थोरात यांची कन्या राजकारणात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे नाट्य घडल्याची चर्चा सुरू आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातून (Nashik Graduate Constituency)ऐनवेळी काँग्रसेचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्या ऐवजी त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मात्र पटोले यांनी आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. सर्व रिपोर्ट हायकमांडला पाठवले आहेत. त्यावर हायकमांडकडून निर्देश येतील. त्याप्रमाणे कारवाई करू;पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. त्यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे.असेही स्पष्ट केले.
सुधीर तांबे यांनी आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे सांगितले. हा एक प्रकारे काँग्रेससोबत धोका आहे. हे सारे हायकमांडला कळवले आहे. हायकमांडचा निर्णय येईल. त्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू. बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही.असेही पटोले यांनी निक्षून सांगितले.
थोरात आणि तांबे कुटुंबात अंतर्गत कलह
सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी एका भाजप नेत्याला फोन केला. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी देऊ नका, अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला, अशी चर्चा सुरू आहे. थोरात आणि तांबे कुटुंबात अंतर्गत कलह आहेत, ते आम्ही चर्चेतून सोडवू, असे थोरात यांचे म्हणणे आहे. थोरात यांची कन्या राजकारणात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे नाट्य घडल्याची चर्चा सुरू आहे.(Nana Patole: Congress has no support for rebel candidate Satyajit Tambe)